
रजत पाटीदार याच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने घरच्या मैदानात महेंद्रसिंह धोनी याच्या चेन्नई सुपर किंग्सवर 2 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. आयुष म्हात्रे याने केलेल्या 94 धावांच्या झंझावाती खेळीमुळे चेन्नई जिंकेल, अशा विश्वास चाहत्यांना होता. मात्र चेन्नईने शेवटच्या चेंडूवर सामना गमावला. चेन्नईला विजयासाठी 213 धावांचा पाठलाग करताना शेवटच्या चेंडूवर 4 धावा हव्या होत्या. मात्र यश दयाल याने अचूक यॉर्कर टाकला. त्यामुळे शिवम दुबेला 1 धावाच मिळाली. आरसीबीने यासह 2 धावांनी सामना जिंकला. आरसीबीचा हा या मोसमातील आठवा विजय ठरला. तर चेन्नईला नवव्या पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईच्या या पराभवानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने स्वत:ला दोषी ठरवलं. धोनी चेन्नईच्या डावातील शेवटच्या ओव्हरमध्ये आऊट झाला. त्यामुळे धोनीने स्वत:ला या पराभवासाठी कारणीभूत ठरवलं.
चेन्नईने 17 व्या ओव्हरमध्ये डेवाल्ड ब्रेव्हीस याच्या रुपात 172 धावांवर चौथी विकेट गमावली. त्यानंतर कर्णधार धोनी शिवम दुबेला पाठवण्याऐवजी स्वत:च मैदानात आला. धोनी आणि रवींद्र जडेजा ही जोडी खेळत होती. त्यामुळे चेन्नईला विजयासाठी 15 धावांची गरज होती. धोनी तेव्हा तिसऱ्या बॉलवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. धोनीने 8 बॉलमध्ये 12 रन्स केल्या. त्यानंतर शिवम दुबे याने 3 बॉलमध्ये 1 सिक्ससह 8 रन्स केल्या. त्यामुळे चेन्नईला 2 धावांनी सामना गमवावा लागला.
“मला वाटतं की मला आणखी काही फटके मारायला पाहिजे होते आणि दबाव कमी करायला हवा होता, त्यामुळे मी या पराभवाची जबाबदारी घेतो”, असं म्हणत धोनीने या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारली आणि स्वत: कमी पडलो, हे मान्य केलं.
तसेच आरसीबीच्या रोमरियो शेफर्ड याने अखेरच्या क्षणी झंझावाती खेळी केली. रोमरियो याने 14 चेंडूत 4 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 53 धावांची वादळी खेळी केली. त्यामुळे आरसीबीला 20 ओव्हरमध्ये 5 विके्टस गमावून 213 धावांपर्यंत मजल मारता आली. धोनीने रोमरियोच्या या खेळीचा उल्लेख करत भेदक गोलंदाजी करण्यात अपयशी ठरल्याचं म्हटलं.
“डेथ ओव्हरमध्ये (शेवटच्या षटकांमध्ये) रोमरियो शेफर्ड याने चांगली बॅटिंग केली. आम्ही केलेल्या बॉलिंगमुळे रोमरियो सिक्स लगावण्यास सक्षम होता. आम्हाला यॉर्करचा सराव करण्याची गरज आहे. जर यॉर्कर टाकण्यात यश मिळत नसेल तर लो फुलटॉस हा चांगला पर्याय आहे” असं म्हणत गोलंदाजांनाही सुनावलं.