ICC U19 World Cup: बांगलादेशविरुद्धच्या क्वार्टर फायनलआधी भारताला मोठा झटका, वासु वत्स दुखापतीमुळे संघाबाहेर

| Updated on: Jan 29, 2022 | 1:10 PM

अंडर 19 वर्ल्डकप (Under 19 world cup) स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये भारताचा आज बांगलादेशविरुद्ध सामना होणार आहे. या सामन्याआधी भारताला एक मोठा झटका बसला आहे.

ICC U19 World Cup: बांगलादेशविरुद्धच्या क्वार्टर फायनलआधी भारताला मोठा झटका, वासु वत्स दुखापतीमुळे संघाबाहेर
Aaradhya Yadav Twitter
Follow us on

अँटिग्वा: अंडर 19 वर्ल्डकप (Under 19 world cup) स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये भारताचा आज बांगलादेशविरुद्ध सामना होणार आहे. या सामन्याआधी भारताला एक मोठा झटका बसला आहे. वासु वत्सला (Vasu Vats) दुखापत झाली आहे. त्याच्याजागी बदली खेळाडू आराध्य यादवचा (Aaradhya Yadav) संघात समावेश करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या बदलाला मान्यता दिली आहे. स्पर्धेच्या टेक्निकल कमिटीने या बदलाला मान्यता दिल्याचे ICC ने स्टेटमेंटद्वारे सांगितले. “वासु वत्सला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. त्यामुळे यापुढे तो स्पर्धेत खेळू शकणार नाही. दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी दुसऱ्या खेळाडूचा संघात समावेश करण्यासाठी स्पर्धेच्या टेक्निकल कमिटीची मान्यता लागते. त्यानंतरच संघात त्या खेळाडूचा समावेश करण्यात येतो” असे आयसीसीने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.

भारत अव्वल स्थानावर
ग्रुप बी मध्ये तिन्ही सामने जिंकून भारत अव्वल स्थानावर आहे. आज भारताची लढत बांगलादेशविरुद्ध होणार आहे. ही नॉकआऊट स्टेज आहे. त्यामुळे भारताला आजच्या सामन्यात विजय मिळवावा लागेल. चार वेळच्या अंडर 19 वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघासमोर गतविजेत्या बांगलादेशचे आव्हान आहे. दोनवर्षांपूर्वी झालेल्या अंडर 19 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत बांगलादेशने भारताचा डकवर्थ लुईस पद्धतीने पराभव केला होता. त्या पराभवाचा वचपा काढण्याची आज संधी चालून आली आहे.

सगळे सामने सहज जिंकले आहेत
कॅप्टन यश धुलसह संघातील काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना युगांडा आणि आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात खेळता आले नाही. पण आजच्या लढतीसाठी कॅप्टन यश धुल आणि अन्य खेळाडू फिट आहेत. भारतासमोर आज बांगलादेशला नमवून विजयी परंपरा कायम राखण्याचं आव्हान आहे. भारताने आतापर्यंत वर्ल्डकपमधले सगळे सामने सहज जिंकले आहेत. यश धुलच्या अनुपस्थितीत संघाची धुरा संभाळणारा निशांत सिंधू कोरोना पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे क्वार्टर फायनलच्या या महत्त्वाच्या सामन्यात निशांत सिंधू खेळणार नाही. त्याच्याजागी अनीश्वर गौतम खेळेल.

सिंधू, राज अंगद बावा आणि अंगक्रिष रघुवंशी यांच्या दमदार कामगिरीच्या बळावर भारताने त्या सामन्यांमध्ये वर्चस्व गाजवलं. पण वर्ल्डकपमधील भारताची खरी परीक्षा आजपासून सुरु होणार आहे. अँटिग्वा येथे संध्याकाळी 6.30 वाजता सामना सुरु होईल.

ICC U19 World Cup Aaradhya Yadav added to Indian squad after Vasu Vats sustained hamstring injury