
आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा संयुक्तरित्या भारत आणि श्रीलंकेकडे आहे. या एका वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी एकूण 8 संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान एकूण 31 सामने नियोजित आहेत. आयसीसीने 16 जून रोजी या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. त्यानुसार सर्व सामने हे बंगळुरु, इंदूर, वायझॅग, गुवाहाटी आणि कोलंबो या शहरात आयोजित करण्यात आले. मात्र या स्पर्धेच्या काही दिवसांआधी आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेत बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सामने होणार नाहीत. आयसीसीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
आयसीसीने बंगळुरुकडे असलेला यजमानपदाचा मान काढून घेतला आहे. त्यामुळे या आयसीसी स्पर्धेतील सामने बंगळुरुत होणार नाहीत. त्यामागे कारणही तसंच आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अंतिम सामन्यात पंजाब किंग्सवर मात करत आयपीएल ट्रॉफी (IPL 2025) जिंकली होती. त्यानंतर बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष करण्यात आला.
आरसीबीच्या खेळाडूंचं स्टेडियममध्ये सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी फ्री एन्ट्री असल्याने चाहत्यांनी तोबा गर्दी केली. क्षमतेपेक्षा अधिक चाहते आल्याने सुरक्षारक्षकांनी स्टेडियमचा मेन आणि इतर गेट बंद केले. मात्र क्रिकेट चाहत्यांना आत जायचं होतं. त्यामुळे सुरक्षारक्षक आणि चाहत्यांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. त्यामुळे हा जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. यात चाहते सैरावैरा पळू लागले. त्यामुळे चेंगराचेंगरी झाले. यात काही चाहत्यांचा मृत्यू झाला. आरसीबीच्या विजयाला गालबोट लागलं.
कर्नाटक सरकारने या सर्व प्रकरणानंतर एका समिती गठीत केली. या समितीने चिन्नास्वामी स्टेडियम हे मोठ्या स्पर्धेतील सामन्यांच्या आयोजनासाठी सुरक्षित नसल्याचं सांगितलं. त्यानंतर आता आयसीसीने वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने बंगळुरुत आयोजित न करण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसीने प्रसिद्धीपत्रकात असं थेट म्हटलेलं नाही. मात्र ऐन वेळेस ठिकाण बदलण्यामागे चेंगराचेंगरी आणि समितीने दिलेल्या निकालामुळेच आयसीसी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.
वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेतील एकूण 4 सामने हे चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार होते. मात्र आता त्या 4 पैकी 2 सामने हे गुवाहाटीत होणार आहेत. तसेच आयसीसीने बंगळुरुच्या हिश्शातील उर्वरित 2 सामने नवी मुंबईला वर्ल्ड कप आयोजित करण्याचा मान दिला आहे. हे 2 सामने नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहेत.
नियोजित वेळापत्रकानुसार, 30 सप्टेंबरला भारत विरुद्ध श्रीलंका तर 3 ऑक्टोबरला इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यांचं आयोजन हे चिन्नास्वामी स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. मात्र आता आयसीसीने वेळापत्रकात बदल केलाय. त्यानुसार वरील दोन्ही सामने हे गुवाहाटीत होणार आहेत.
तसेच 20 ऑक्टोबरला श्रीलंका विरुद्ध बांगलादेश हा सामना कोलंबोऐवजी नवी मुंबईत होणार आहे. तसेच आणखी 2 सामने हे डी वाय पाटील स्टेडिममध्ये होणार आहेत जे आधी बंगळुरुत आयोजित करण्यात आले होते.
इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (23 ऑक्टोबर) आणि इंडिया विरुद्ध बांगलादेश (26 ऑक्टोबर) हे सामने नवी मुंबईत होतील. तसेच पाकिस्तान अंतिम फेरीत पोहचल्यास महामुकाबला कोलंबोत होईल अन्यथा डी वाय पाटील स्टेडियममध्ये वर्ल्ड कप विजेता निश्चित होईल.