
आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने विजयाचं खात उघडलं आहे. दक्षिण आफ्रिकेने स्पर्धेतील सातव्या आणि आपल्या मोहिमेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडवर 6 विकेट्सने पहिला विजय साकारला आहे. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 232 धावांचं आव्हान दिलं होतं. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 55 बॉलआधी 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेने 40.5 ओव्हरमध्ये 234 रन्स केल्या. तर न्यूझीलंडचा हा सलग दुसरा पराभव ठरला.
ताझमीन ब्रिट्स हीने दक्षिण आफ्रिकेच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. ताझमीनने सर्वाधिक धावा केल्या. ताझमीनने 89 चेंडूत 1 षटकार आणि 15 चौकारांच्या मदतीने 101 धावा केल्या. लॉरा वोल्वार्ड्ट आणि मॅरिझॅन कॅप या दोघींनी प्रत्येकी 14-14 धावांचं योगदान दिलं. सुने लुस
आणि सिनालो जाफ्ता या जोडीने दक्षिण आफ्रिकेला विजयापर्यंत पोहचवलं. सुने लुस हीने 114 बॉलमध्ये नॉट आऊट 83 रन्स केल्या. सुनेने या खेळीत 9 फोर आणि 1 सिक्स लगावला. तर सिनालोने नाबाद 6 धावांचं योगदान दिलं. न्यूझीलंडकडून एकूण 7 जणांनी बॉलिंग केली. त्यापैकी फक्त दोघींनाच विकेट्स मिळाल्या. मात्र त्याचा न्यूझीलंडसाठी काही फायदा झाला नाही.
त्याआधी न्यूझीलंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. न्यूझीलंडने बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र न्यूझीलंडला पूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही. न्यूझीलंडचा डाव 13 बॉलआधी आटोपला. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला 47.5 ओव्हरमध्ये 231 रन्सवर ऑलआऊट केलं.
न्यूझीलंडसाठी कॅप्टन सोफी डीव्हाईन हीने सर्वाधिक धावा केल्या. सोफीने 98 बॉलमध्ये 9 फोरसह 85 रन्स केल्या. सोफी व्यतिरिक्त एकीलाही चांगल्या सुरुवातीचं मोठ्या खेळीत रुपांतर करता आलं नाही. ब्रुक हॅलिडे हीने 45 धावा केल्या. जॉर्जिया प्लिमरने 31 रन्स केल्या. तर अमेलिया केर 23 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना तिथपर्यंतही पोहचता आलं नाही. न्यूझीलंडने शेवटच्या 5 विकेट्स या 19 धावांच्या मोबदल्यात गमावल्या. अशाप्रकारे न्यूझीलंडचं 231 रन्सवर पॅकअप झालं. दक्षिण आफ्रिकेसाठी नॉनकुलुलेको म्लाबा हीने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. तर इतरांनी तिला चांगली साथ दिली.
दरम्यान न्यूझीलंडचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा पराभव ठरला. याआधी न्यूझीलंडला 1 ऑक्टोबरला गतविजेत्या ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. न्यूझीलंडच्या सलग 2 पराभवामुळे आता उपांत्य फेरीत पोहचण्याची शक्यता कमी झाली आहे.