
आयपीएल 2025 स्पर्धेचा विजेता 3 जूनला कोण असेल ते कळणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने क्वॉलिफायर 1 फेरीत पंजाब किंग्सचा धुव्वा उडवून अंतिम फेरी गाठली आहे. आता क्वॉलिफायर 2 मध्ये पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स भिडणार आहे. यापैकी विजयी संघाची लढत आरसीबीशी होणार आहे. आरसीबीने 9 वर्षानंतर म्हणजेच 2016 नंतर अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पण गेल्या 17 वर्षांपासून जेतेपदाची प्रतीक्षा मात्र कायम आहे. अशा स्थितीत आरसीबी यंदा तरी जेतेपद मिळवेल ना, अशी धाकधूक चाहत्यांना लागून आहे. कारण यापूर्वी तीनदा जेतेपदाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे अंतिम सामन्यात आरसीबीकडून सर्वोत्तम खेळीची अपेक्षा आहे. असं असताना एका महिला फॅनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत फॅनने जर आरसीबी जिंकली नाही तर घटस्फोट घेणार असल्याची धमकी दिली आहे.
29 मे रोजी मुल्लांपूरच्या महाराजा यादवेंदर सिंह स्टेडियममध्ये क्वॉलिफायर 1 चा सामना पार पडला. हा सामना पंजाब किंग्सने 8 विकेट जिंकला. यापूर्वी साखळी फेरीतील शेवटचा सामना लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध झाला होता. तेव्हा मैदानात उपस्थित असलेल्या महिला फॅनने एक पोस्टर झळकावलं. त्या पोस्टरवरील संदेश व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. या पोस्टरवर तिने लिहिलं होतं की, ‘जर आरसीबी अंतिम सामना जिंकली नाही तर मी पतीला घटस्फोट देईल.’ सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. काही जण हे व्हिडीओ हसण्यावर नेत आहेत. तर काही जण या व्हिडीओकडे गंभीरतेने पाहात आहेत. फ्रेंचायझीच्या जेतेपदासाठी नातं डावावर लावू नये असा सल्ला काही जणांनी दिला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि त्यांच्या चाहत्यांची कायम चर्चा होत असते. एकही जेतेपद मिळवलं नसताना आरसीबीचा फॅन बेस तगडा आहे. दरवर्षी जेतेपदाची आस घेऊन चाहते मैदानात हजेरी लावत असतात. पण यंदा ही संधी पुन्हा चालून आली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम फेरीचा सामना होणार आहे. दरम्यान साखळी फेरीत आरसीबीने 14 पैकी 9 सामन्यात विजय मिळवला. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता त्यामुळे एक गुण मिळाला. आरसीबी 19 गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिली.