
IPL 2021 या आयपीएलच्या 14 व्या पर्वात ऑरेंज कॅप अर्थात सर्वाधिक धावा करण्याचा मान मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) मिळवला आहे. अंतिम सामना संपण्यापूर्वीच हा निर्णय़ समोर आला आहे. कारण सध्या फलंदाजी करत असलेल्या केकेआरचा एकही फलंदाज ऋतुच्या धावांच्या आसपासही नाही. पण चेन्नईचाच दुसरा खेळाडू फाफ मात्र हा मान मिळवण्यात अवघ्या 2 धावांनी मागे राहिला आहे. गायकवाडने अंतिम सामन्यात 32 तर फाफने 86 धावा केल्या आहेत.

यंदाच्या पर्वात खासकरुन युएईत झालेल्या सामन्यात चेन्नईच्या ऋतुराजने अतिशय दमदार अशी फलंदाजी केली आहे. त्याने 16 सामन्यात त्याने 635 धावा केल्या आहेत. या खेळीत एका शतकासह 4 अर्धशतकांचा ही समावेश आहे.

ऋतुराजनंतर त्याच्याच संघाचा खेळाडू फाफ डुप्लेसीस याचा नंबर लागतो. अंतिम सामन्यात तब्बल 86 धावा ठोकणारा फाफ मागून अतिशय वेगात ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पुढे आला. पण अखेरीस 16 सामन्यात तो 633 धावाच करु शकला. त्याने 6 अर्धशतकं ठोकली असून अवघ्या दोन धावांनी ऋतु पुढे राहिला आणि फाफचा ऑरेंज कॅप पटकावण्याचा मान हुकला.

तिसऱ्या स्थानावर आहे पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुल. राहुलचा संघल प्लेऑफमध्ये न गेल्याने तो केवळ 13 सामनेच खेळू शकला. पण या सामन्यातही त्याने तब्बल 626 धावा ठोकल्या. पण अखेर ऋतु आणि फाफ पुढे गेल्याने तो तिसऱ्या स्थानावर राहिला आहे.

या यादीत चौथ्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्सचा दिग्गज खेळाडू शिखर धवन हा आहे. त्यानेही 16 सामने खेळले असून त्यामध्ये 587 धावा केल्या आहेत.

यानंतर पाचव्या स्थानावर रॉयल चँलेजर्स बंगळुरुचा ग्लेन मॅक्सवेल असून त्याने 15 सामन्यात 513 धावा केल्या आहेत.