
भारतीय क्रिकेट संघाने रविवारी 27 सप्टेंबरला अंतिम सामन्यात पाकिस्तानवर 5 विकेट्सने मात करत नवव्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकली. भारताने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात सलग 7 सामने जिंकून आशिया चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला. तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा या जोडीने भारतासाठी बॅटिंगने प्रमुख भूमिका बजावली. अभिषेकने साखळी आणि सुपर 4 फेरीत चमकदार कामगिरी केली. मात्र अभिषेक अंतिम सामन्यात काही खास करु शकला नाही. मात्र तिलकने निर्णायक कामगिरी करत भारताला विजयी करण्यात प्रमुख भूमिका बजावली. तिलकने अंतिम सामन्यात 147 धावांचा पाठलाग करताना भारतासाठी सर्वाधिक आणि नाबाद 69 धावा केल्या. त्यानंतर आता ही जोडी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडण्यासाठी सज्ज झाली आहे.
इंडिया ए श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध एकूण 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. या मालिकेतील शेवटच्या 2 सामन्यांसाठी अभिषेक आणि तिलक या दोघांची निवड करण्यात आली आहे. या मालिकेतील तिन्ही सामने हे कानपूरमध्ये होणार आहेत. या मालिकेला 30 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.
पहिला सामना, 30 सप्टेंबर, कानपूर
दुसरा सामना, 3 ऑक्टोबर, कानपूर
तिसरा सामना, 5 ऑक्टोबर, कानपूर
ऑस्ट्रेलिया ए विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी इंडिया ए टीममध्ये अभिषेक शर्मा आणि तिलक व्यतिरिक्त आशिया कप विजेता संघातील आणखी दोघांचा समावेश आहे. हर्षित राणा आणि अर्शदीप सिंह या वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. या दोघांनाही शेवटच्या 2 सामन्यांसाठी संधी दिली आहे.
दरम्यान अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा या जोडीने आशिया कप 2025 स्पर्धेत तडाखेदार बॅटिंग केली. या दोघांनीही सातही सामने खेळले. अभिषेकने आपल्या पहिल्याच आशिया कप स्पर्धेत इतिहास रचला. अभिषेक एका टी 20i आशिया कप स्पर्धेत 300 धावा करणारा पहिलाच फलंदाज ठरला. अभिषेकने 7 सामन्यांमध्ये 314 धावा केल्या. तर तिलक वर्मा याने एकूण 213 धावा केल्या. त्यामुळे आता ही जोडी कानपूरमध्ये कशी कामगिरी करते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान श्रेयस अय्यर याला या मालिकेत चमकदार कामगिरी करुन टीम इंडियात परतण्याची सुवर्णसंधी आहे. श्रेयसने काही दिवसांपूर्वीच आपण काही महिने रेड बॉल क्रिकेटसाठी उपलब्ध नसणार, असं कळवलं होतं. त्यामुळे श्रेयस वनडे आणि टी 20 क्रिकेट खेळणार असल्याचं स्पष्ट आहे. त्यामुळे आता श्रेयस कांगारुंविरुद्ध मायदेशात कर्णधार आणि फलंदाज म्हणून कशी कामगिरी करतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.