IND vs ENG: कसोटी कर्णधार शुबमन गिलसाठी विराट कोहलीने केली खास पोस्ट, म्हणाला…

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचं पारडं जड आहे. हा सामना जिंकण्यासाठी आणखी 7 विकेट काढव्या लागतील. असं असताना विराट कोहलीने शुबमन गिलसाठी खास पोस्ट केली आहे.

IND vs ENG:  कसोटी कर्णधार शुबमन गिलसाठी विराट कोहलीने केली खास पोस्ट, म्हणाला...
IND vs ENG: कसोटी कर्णधार शुबमन गिलसाठी विराट कोहलीने केली खास पोस्ट, म्हणाला...
Image Credit source: टीव्ही 9 नेटवर्कवरून
| Updated on: Jul 06, 2025 | 10:00 PM

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर शुबमन गिलकडे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात पहिला इंग्लंड दौरा आहे. हा कठीण असा दौरा आहे. या दौऱ्यातील पहिल्याच कसोटी सामन्यात टीम इंडियाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचं पारडं जड दिसत आहे. दुसरीकडे, कसोटीत विराट कोहलीची जाग कोण घेईल असा प्रश्न होता. शुबमन गिलने चौथ्या क्रमांकावर खेळण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या दोन कसोटीतच कमाल केली. पहिल्या कसोटी सामन्यात शतक, दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 269 आणि दुसऱ्या डावात 161 धावा केल्या. त्यामुळे विराट कोहलीच्या जागी शुबमन गिल अगदी फिट बसला आहे. त्याची ही खेळी पाहून विराट कोहलीने शुबमन गिलचं कौतुक केलं आहे.

एजबेस्टन कसोटी सामन्याच्या तिसऱ्या डावात शतकी खेळी केल्यानंतर विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शुबमन गिलचे अभिनंदन केले. कोहलीने त्याच्या शानदार फलंदाजीचे कौतुक करत म्हणाला की, “तू इतिहास पुन्हा घडवत आहेस.” सोशल मीडियापासून दूर राहिलेल्या विराट कोहलीने गिलच्या फोटोसह अभिनंदनपर पोस्ट शेअर केली आणि लिहिले, “शाब्बास स्टार बॉय. तू इतिहास पुन्हा लिहिशील. पुढे जात राहा आणि येथून वर जा.. तू या सर्व गोष्टींना पात्र आहेस.” दरम्यान भारताने कसोटी सामना जिंकला तर मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली जाईल. त्यामुळे हा सामना जिंकणं टीम इंडियाला भाग आहे.

विराट कोहलीने 2014 पासून कसोटी क्रिकेट कर्णधारपदाच्या कारकि‍र्दीला सुरुवात केली होती. तेव्हा त्याने पहिल्या दोन सामन्यात तीन शतकं ठोकली होती. कोहलीनंतर जवळपास 11 वर्षांनी कसोटी संघाचं तरुण खेळाडू कर्णधारपद भूषवत आहे. गिलनेही पहिल्या दोन कसोटी सामन्यात तीन शतकं ठोकली आहेत. शुबमन गिलने कर्णधार म्हणून त्याच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये विराट कोहलीचा 449 धावांचा विक्रमही मोडीत काढला आहे. शुबमन गिलने कर्णधार म्हणून पहिल्या दोन सामन्यांमध्ये 585 धावा केल्या आहेत.