IND vs ENG : तिसऱ्या टी20 सामन्यासाठी टीम इंडियात मोठा बदल, विकेटटेकर गोलंदाजाला बसवून शमीला संधी
भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा टी20 सामना राजकोटवर सुरु झाला आहे. सलग तिसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी प्लेइंग 11 मध्ये बदल करण्यात आला आहे. मोहम्मद शमीची प्लेइंग 11मध्ये एन्ट्री झाली आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात होत असलेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारताचा दिग्गज गोलंदाज मोहम्मद शमीला संधी मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मोहम्मद शमी खेळणार की नाही याची चर्चा रंगली होती. मात्र या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. मोहम्मद शमीने 14 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. मोहम्मद शमीने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर 2023 मध्ये खेळला होता. जवळपास 436 दिवसानंतर टीम इंडियामध्ये पुनरागमन केलं आहे. इतकंच काय तर 26 महिन्यानंतर टी20 सामना खेळत आहे. मोहम्मद शमीने पहिलं षटक टाकत 6 धावा दिल्या. पहिला चेंडू निर्धाव टाकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार आला. तिसरा आणि चौथा चेंडू निर्धाव गेला. पाचव्या चेंडूवर एक धाव आली आणि सहावा चेंडू निर्धाव गेला.
मोहम्मद शमीने शेवटचा टी20 सामना 2022 टी20 वर्ल्डकपमध्ये खेळला होता. त्यानंतर त्याला टीम इंडियात संधी मिळाली नाही. मोहम्मद शमीचा हा 24 वा टी20 सामना आहे. त्याने मागच्या 23 सामन्यात 8.94 च्या इकोनॉमी रेटने धावा दिल्या आहेत तसेच 24 विकेट घेतल्या आहेत. टी20 मध्ये मोहम्मद शमीला स्थान देण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे तो फिट आहे की नाही चाचपणी होईल. मागच्या काही दिवसांपासून मोहम्मद शमी देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. पण त्याच्या गुडघ्याला हलकी सूज आली होती. त्यामुळे टीम इंडियात कमबॅक करण्यास उशीर झाला. पहिल्या दोन टी20 सामन्यात त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली नाही. मात्र तिसऱ्या सामन्यात अर्शदीप सिंगच्या जागी त्याला संघात स्थान मिळालं आहे.
दोन्ही संघाची प्लेइंग 11
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी स्मिथ (विकेटकीपर), जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड.
भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), ध्रुव जुरेल, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती