
शुबमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. उभयसंघातील पहिला सामना हा बडोद्यातील कोटांबी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हा या स्टेडियममधील पहिला सामना असणार आहे. या सामन्याच्या 1 दिवसआधी टीम इंडियाच्या खेळाडूंनी नेट्समध्ये जोरदार सराव केला. मात्र भारतीय फलंदाज विराट कोहली याने सराव सत्राबाबत मोठा निर्णय घेतला. विराट कायमच नेट्समध्ये जास्तीत जास्त सराव करत असतो. मात्र विराटने पहिल्या सामन्याच्या काही तासांआधी घेतलेल्या अशा निर्णयामुळे चाहत्यांकडूनही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विराट या सराव सत्रात सहभागी झाला नाही. मात्र विराटने तसा निर्णय का घेतला? हे आपण जाणून घेऊयात.
न्यूझीलंड विरूद्धच्या सलामीच्या सामन्याआधी कर्णधार शुबमन गिल, रोहित शर्मा, केएल राहुल या अनुभवी खेळाडूंनी कसून सराव केला. ऋषभ पंत, उपकर्णधार श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज हे देखील सरावासाठी उपस्थित होते. हा सराव ऐच्छिक होता. सराव सत्र बंधनकारक नव्हता. त्यामुळे विराटने सराव न करण्याचा निर्णय घेतला.
न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत विराटच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. विराट गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने खोऱ्याने धावा करत आहे. विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या शेवटच्या एकदिवसीय मालिकेत सलग तिन्ही सामन्यांत 50 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 शतकं आणि 1 अर्धशतक लगावलं होतं.
त्यानंतर विराटने देशांतर्गत क्रिकेटमध्ये विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतही धमाका केला त्यामुळे विराटकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची आशा असणार आहे. तसेच विराट 20 हजार आंतरराष्ट्रीय धावांपासून फार जवळ आहे. विराटला त्यासाठी फक्त 25 धावांची गरज आहे.
वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने बॅटिंग सुधारण्यासाठी रोहित शर्माकडून सल्ला घेतला. ऋषभ पंतला सरावादरम्यान दुखापत झाली. पंतला दुखापतीमुळै मैदानाबाहेर जावलं लागलं.
उपकर्णधार श्रेयस अय्यर आणि केएल राहुल या दोघांनी एकत्र फलंदाजीचा सराव केला. तसेच कर्णधार शुबमन गिल याने निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्यासह बराच वेळ संवाद साधला.