IND vs NZ Final : टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा टी 20i वर्ल्ड चॅम्पियन, फायनलमध्ये न्यूझीलंडचा 96 धावांनी धुव्वा

India vs New Zealand, T20i World Cup 2026 Final Result : टीम इंडियाने न्यूझीलंडवर सांघिक कामगिराच्या जोरावर दणदणीत विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा आणि सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात पहिल्यांदा टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याचा कारनामा केला आहे.

IND vs NZ Final : टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा टी 20i वर्ल्ड चॅम्पियन, फायनलमध्ये न्यूझीलंडचा 96 धावांनी धुव्वा
T20i World Cup 2026 Winner Team India
Image Credit source: Bcci
| Updated on: Mar 08, 2026 | 11:13 PM

टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात इतिहास घडवला आहे. टीम इंडियाने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये न्यूझीडंवर 96 धावांच्या एकतर्फी फरकाने मात करत आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 256 धावांचं विक्रमी आव्हान ठेवलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर न्यूझीलंडला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. टीम इंडियाने न्यूझीलंडला 19 ओव्हरमध्ये 159 रन्सवर गुंडाळलं. भारताने यासह सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात पहिल्याच झटक्यात टी 20i वर्ल्ड कप जिंकला. तसेच भारताची ही टी 20i वर्ल्ड कप चॅम्पियन होण्याची सलग दुसरी तर एकूण तिसरी वेळ ठरली. भारताने 2024 साली रोहित शर्मा याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेवर मात करत 17 वर्षांनंतर पहिला टी 20i वर्ल्ड कप जिंकला होता. त्याआधी महेंद्रसिंह धोनी याने भारताला 2007 साली पहिल्याच झटक्यात ही ट्रॉफी जिंकून दिली होती.

टीम इंडियाची बॅटिंग

न्यूझीलंडने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारताने या संधीचा फायदा घेत न्यूझीलंडसमोर धावांचा डोंगर रचला. भारताने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 255 धावांचा डोंगर उभा केला. भारतासाठी संजू सॅमसन याने सर्वाधिक 89 धावा केल्या. इशान किशन याने 54 तर अभिषेक शर्मा याने 52 धावांचं योगदान दिलं.

हार्दिक पंड्या 18 धावांवर बाद झाला. तर अखेरच्या क्षणी शिवम दुबे याने फटकेबाजी करत फिनिशिंग टच दिला. शिवमने 20 व्या ओव्हरमध्ये एकट्याने 24 धावा करत एकूण आणि नाबाद 26 धावा केल्या. तर तिलकने नॉट आऊट 8 रन्स केल्या. न्यूझीलंडसाठी जेम्स निशाम याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर मॅट हेन्री आणि रचीन रवींद्र या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

बुमराहचा चौकार

न्यूझीलंडच्या 3 फलंदाजांनाच विजयी धावांचा पाठलाग करताना दुहेरी आकडा गाठता आला. न्यूझीलंडसाठी ओपनर टीम सायफर्ट याने याने अर्धशतकी खेळी करुन न्यूझीलंडला सामन्यात कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र डोंगराएवढ्या धावसंख्येसमोर फिनचा हा प्रयत्न प्रयत्नच ठरला. टीमने 26 बॉलमध्ये सर्वाधिक 52 रन्स केल्या. कॅप्टन मिचेल सँटनर याने 43 धावांचं योगदान दिलं. तर डॅरेल मिचेल याने 17 धावा जोडल्या. तर इतरांना भारतीय गोलंदाजांसमोर दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

टीम इंडियासाठी जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. अक्षर पटेल याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर हार्दिक पंड्या, अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्ती या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

टीम इंडियाचा 2024 पासून टी 20i वर्ल्ड कपमधील 16 वा विजय

भारताचा हा आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील 2024 पासूनचा 17 वा सामना होता. भारताने न्यूझीलंडला पराभूत करत 2024 पासून 16 वा विजय मिळवला. तर भारताने एकमेव सामना हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुपर 8 फेरीत नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गमावला.

भारत टी 20i वर्ल्ड कपमधील सर्वात यशस्वी संघ

टीम इंडियाचा हा आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील हा 61 वा सामना होता. टीम इंडियाने न्यूझीलंडला पराभूत करत 61 सामन्यांमधील 45 वा विजय मिळवला.

Follow Us