
मेन्स टीम इंडियाने रविवारी 28 सप्टेंबरला 17 व्या आशिया कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात पाकिस्तानवर 5 विकेट्सने विजय मिळवला. भारताने यासह सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टी 20I आशिया कप 2025 ट्रॉफीवर नाव कोरलं. भारताचा हा या स्पर्धेतील एकूण तसेच सलग सातवा आणि पाकिस्तान विरुद्धचा तिसरा विजय ठरला. भारत-पाकिस्तानची 17 व्या आशिया कप स्पर्धेत आमनेसामने येण्याची ही तिसरी वेळ होती. भारताने याआधी साखळी आणि सुपर 4 फेरीत पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा हे 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघ आमनेसामने येणार आहेत.
आशिया कप 2025 स्पर्धेत सलग 3 रविवारी भारत-पाकिस्तान आमनेसामने आले. उभयसंघात फायनलआधी 14 आणि 21 सप्टेंबरला सामना झाला होता. टीम इंडियाने या दोन्ही सामन्यात पाकिस्तान विरुद्ध धावांचा पाठलाग करताना विजय मिळवला. त्यानंतर आता अवघ्या काही दिवसांनी पुन्हा शेजारी देशांचे क्रिकेट संघ आमनेसामने असणार आहेत. क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा आणि सलग चौथ्या रविवारी भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार अनुभवयाला मिळणार आहे. या सामन्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मेन्सनंतर आता वूमन्स टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध भिडण्यासाठी सज्ज आहे. आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान हे 2 कट्टर प्रतिस्पर्धी भिडणार आहेत. महिला ब्रिगेडचा हा सामना जिंकून पाकिस्तान विरुद्धचा भारताचा सर्वच बाबतीतील दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे.
वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत रविवारी 5 ऑक्टोबरला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 11 सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने या 11 पैकी सर्वाधिक सामने जिंकले आहेत. तसेच दोन्ही संघात वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 4 सामने झाले आहेत. भारताने हे चारही सामने जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडिया पाकिस्तान विरुद्धची आघाडी आणखी मजबूत करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हा सामना कोलंबोत होणार आहे. पाकिस्तान या स्पर्धेतील आपले सर्व सामने कोलंबोत खेळणार आहे.
आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2025 टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कर्णधार), मंधाना, प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ति शर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, रेणुका सिंह, अरुंधति रेड्डी, ऋचा घोष, क्रांति गौड़, अमनजोत कौर, राधा यादव, श्री चरणी, यास्तिका भाटिया आणि स्नेह राणा.