
दक्षिण आफ्रिकेने भारत दौऱ्याची जोरदार सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेने भारताला दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये पराभूत केलं. दक्षिण आफ्रिकेने टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वात भारतात 25 वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली. आता त्यानंतर उभयसंघांमध्ये एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला 30 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना हा रांचीतील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्यात हवामान कसं असेल? हे जाणून घेऊयात.
आतापर्यंत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात रांचीत एकमेव एकदिवसीय सामना खेळवण्यात आला आहे. भारताने या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 7 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे भारतीय संघ पुन्हा एकदा या मैदानात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रांचीत पहिल्या सामन्यादरम्यान हवामान स्वच्छ असेल. रविवारी 30 नोव्हेंबरला कमाल तापमान हे 24 अंश सेल्सियस इतके असेल. तर किमान तापमान 12 अंश सेल्सियस असू शकतं.
सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. तसेच सामना डे-नाईट असल्याने टॉस फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे. दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे टॉस जिंकणारा संघ फिल्डिंगसाठी आग्रही असेल.
रांचीतील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर राहिली आहे. मात्र ठराविक वेळेनंतर फिरकीपटूंनाही मदत मिळू शकते. तसेच दुसऱ्या डावात खेळ कसा होणार? हे परिस्थितीवर अवलंबून असेल. रात्री दव न पडल्यास फिरकी गोलंदाजांची चलती पाहायला मिळू शकते. मात्र पहिल्या सामन्यात दव पडणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात फलंदाजांना मोठे फटके मारण्यास मदत मिळेल.
दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या एकदिवसीय मालिकेत केएल राहुल भारताचं नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताचा नियमित कर्णधार शुबमन गिल याला मानेला दुखापत झाली आहे. त्यामुळे शुबमनला या एकदिवसीय मालिकेला मुकावं लागलं आहे. शुबमनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकातात झालेल्या कसोटी सामन्यात दुखापत झाली होती.
केएलने भारताचं 2 वर्षांआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धचं एकदिवसीय मालिकेत नेतृत्व केलं होतं. त्यामुळे केएल यंदाही भारताला विजयी करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.