Virat Kohli Century : 5 सिक्स-7 फोर, विराट कोहली याचा शतकी तडाखा, सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

Virat Kohli Century IND vs SA : रनमशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहली याने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई करत स्फोटक शतक ठोकलं आहे. विराटने रांचीतील मैदानात ही खेळी केली.

Virat Kohli Century : 5 सिक्स-7 फोर, विराट कोहली याचा शतकी तडाखा, सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
Virat Kohli Century
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Nov 30, 2025 | 5:26 PM

भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेची धमाकेदार सुरुवात केली आहे. विराटने रांचीतील जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियममध्ये वादळी शतक झळकावलं आहे. विराटने 102 बॉलमध्ये हे शतक पूर्ण केलं. विराटच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे 52 वं शतक ठरलं. विराटला या खेळीचं आणखी मोठ्या आकड्यात रुपांतर करण्याची संधी आहे. विराटला वनडे करियरमध्ये द्विशतक करता आलेलं नाही. त्यामुळे विराटला द्विशतक करण्याची ही मोठी संधी आहे.  त्यामुळे विराट शतकानंतर आता आणखी किती धावा जोडणार? याची चाहत्यांना प्रतिक्षा लागून आहे.

यशस्वी जैस्वाल आऊट झाल्यानंतर विराट कोहली तिसऱ्या स्थानी बॅटिंगसाठी आला. विराटने सुरुवातीपासूनच फटकेबाजी केली. विराटने 48 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. विराटने त्यानंतर अर्धशतकापासून शतकापर्यंत पोहचण्यासाठी आणखी 54 चेंडूंचा सामना केला. विराटला शतकासाठी 1 धावेची गरज होती. तेव्हा विराटने 38 व्या ओव्हरमध्ये फोर ठोकून शतक पूर्ण केलं. विराटने 102 बॉलमध्ये 100.98 च्या स्ट्राईक रेटने 103 रन्स केल्या. विराटने या खेळीत 5 सिक्स आणि 7 फोर लगावले.

52 वं एकदिवसीय शतक

विराटच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे दक्षिण आफ्रिकेविरुद्धचं सहावं, वनडेतील 52 वं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 83 वं शतक ठरलं. विराट एकदिवसीय क्रिकेटमध्ये 52 शतक करणारा पहिलावहिला फलंदाज ठरला. तसेच विराटने सचिन तेंडुलकर आणि रिकी पॉन्टिंग या माजी दिग्गज फलंदाजांचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला.

सचिन-पॉन्टिंगचा रेकॉर्ड ब्रेक

विराटने या खेळीदरम्यान सचिन तेंडुलकर आणि रिकी पॉन्टिंग या दोघांना पछाडलं. विराट वनडे क्रिकेटमध्ये तिसऱ्या स्थानी बॅटिंग करताना करताना सर्वाधिक सिक्स लगावणारा पहिला फलंदाज ठरला. विराटने 2 सिक्स लगावताच ही कामगिरी केली.

तसेच त्याआधी विराट  कोहली यानेअर्धशतक करताच सचिनला मागे टाकलं. विराटने या खेळीसह सचिनचा मायदेशात सर्वाधिक वेळा 50 पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम मोडीत काढला. सचिनने वनडे क्रिकेटमध्ये 58 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. तर विराटची ही मायदेशात 59 वी वेळ ठरली.

विराटचं ऐतिहासिक शतक

विराट एकमेव फलंदाज

तसेच विराटने रिकी पॉन्टिंग आणि सचिन तेंडुलकर या दोघांना मागे टाकण्याव्यतिरिक्त आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. विराट द्विपक्षीय एकदिवसीय सामन्यांमध्ये 10 हजार धावा करणारा क्रिकेट विश्वातील पहिलावहिला फलंदाज ठरला आहे. विराटच्या नावावर या सामन्याआधी 9 हजार 936 धावा होत्या. विराटने 64 वी धाव घेताच इतिहास घडवला.