IND vs SA: आऊट दिल्याने रोहित शर्माला बसला आश्चर्याचा धक्का, तिसऱ्या पंचांच्या निर्णयामुळे आवाक्

IND vs SA, 2nd ODI: भारत दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात रोहित शर्मा काही खास करू शकला नाही. 14 धावा करून तंबूत परतला. पण तिसऱ्या पंचाच्या निर्णयामुळे त्याला आश्चर्याचा धक्का मात्र बसला.

IND vs SA: आऊट दिल्याने रोहित शर्माला बसला आश्चर्याचा धक्का, तिसऱ्या पंचांच्या निर्णयामुळे आवाक्
IND vs SA: रोहित शर्माला आऊट दिल्याने बसला आश्चर्याचा धक्का, तिसऱ्या पंचांच्या निर्णयामुळे आवाक्
Image Credit source: PTI
Updated on: Dec 03, 2025 | 3:38 PM

रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर दक्षिण अफ्रिकेविरुद्धही जबरदस्त खेळी केली. दुसऱ्या वनडे सामन्यातही त्याच्याकडून तशाच खेळीची अपेक्षा होती. मात्र तसं झालं नाही. रायपूर वनडे सामन्यात रोहित शर्माची खेळी अवघ्या 14 धावांवर संपुष्टात आली. पाचव्या षटकातच त्याची विकेट पडली आणि त्याच्या खेळीला ब्रेक लागला. नांद्रे बर्गरच्या गोलंदाजीच्या पहिल्या तीन चेंडूवर त्याने सलग चौकार मारले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर काही धाव घेता आली नाही. पाचव्या चेंड़ूवर रोहित शर्मा फटका मारताना फसला आणि चेंडू थेट विकेटकीपर क्विंटन डिकॉकच्या हाती गेला. रोहित शर्माला बाद देण्यात आलं. पण रोहित शर्माला बाद दिल्याने आश्चर्याचा धक्का बसला. कारण मैदानी पंचानी त्याला नाबाद घोषित केलं होतं. पण दक्षिण अफ्रिकी खेळाडूंनी त्यासाठी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. त्यानंतर तिसऱ्या पंचांनी मैदानी पंचांचा निर्णय बदलला आणि बाद असल्याचं सांगितलं. त्यामुळे रोहित शर्माचा हिरमोड झाला. कारण मोठी धावसंख्या करण्याची एक संधी त्याच्याकडून हुकली. वर्षभरात खूप कमी वनडे मालिका असल्याने फॉर्म दाखवण्याची खूपच कमी संधी आहेत.

क्विंटन डिकॉकच्या ग्लोव्ह्जमध्ये चेंडू गेल्यानंतर त्याने जोरदार अपील केलं. पण नांद्रे बर्गरच्या अपील खास काही आत्मविश्वास नव्हता. पंचांनी देखील नाबाद असल्याचं सांगितलं. पण कर्णधार टेम्बा बावुमाने डिकॉकसोबत चर्चा केली. क्विंटन कर्णधार टेम्बा बावुमाला बाद असल्याचं सांगत होता. त्यानंतर बावुमाने त्याच्या विनंतीला मान देत डीआरएस घेतला. तिसऱ्या पंचांनी व्हिडीओ फुटेज पाहिलं आणि चेंडू बॅटच्या किनाऱ्याला घासून गेल्याचं स्निकोमीटरमध्ये दिसून आलं. तिसऱ्या पंचांनी मैदानी पंचांना त्यांचा निर्णय बदलण्यास सांगितलं.

रोहित शर्मा तिसऱ्या पंचाच्या या निर्णयाने आवाक् झाला. त्याला कट लागल्याचं जाणवलं देखील नव्हतं. त्यामुळे आश्चर्याचा धक्का बसणं सहाजिकच आहे. रोहित शर्माला या निर्णयानंतर तंबूत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. रोहित शर्माने 8 चेंडूचा सामना करून 14 धावा केल्या. रोहित शर्मा ज्या शैलीत खेळत होता ते पाहता, जर त्याला जीवनदान मिळालं असतं तर मग दक्षिण अफ्रिकी गोलंदाजांना कठीण गेलं असतं.