
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेची सुरुवात आणि शेवटही विजयासह केली. भारताने रांचीत पाहुण्या संघाला पराभूत करत विजयी सलामी दिली. मात्र दक्षिण आफ्रिकेने रायपूरमध्ये विजय मिळवला. त्यामुळे तिसरा सामना हा मालिकेच्या दृष्टीने निर्णायक ठरला. मात्र टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवत मालिका आपल्या नावावर केली. भारताने या विजयासह कसोटी मालिकेतील पराभवाची परतफेडही केली. दक्षिण आफ्रिकने भारताला कसोटी मालिकेत 2-0 ने व्हाईटवॉश केलं होतं. दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक शुक्री कोनराड यांनी कसोटी मालिकेदरम्यान टीम इंडियाबाबत एक शब्द वापरला होता. त्यामुळे वाद झाला होता. मात्र एकदिवसीय मालिकेनंतर शुक्री यांनी त्या शब्दाबाबत स्पष्टीकरण दिलं. त्यांनी चूक मान्य केली. मात्र माफी मागण्याचा मोठेपणा दाखवला नाही.
शुक्री कोनराड यांनी गुवाहाटी कसोटीदरम्यान टीम इंडियाला उद्देशून “ग्रोवेल” या शब्दाचा उपयोग केला होता. ग्रोवेल म्हणजे गुडघ्यावर आणणं किंवा गुडघे टेकण्यास भाग पाडणं असा होतो. शुक्री यांच्या या विधानानंतर अनेक माजी क्रिकेटपटूंनी संताप व्यक्त केला होता. शुक्री यांना पत्रकार परिषदेत तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यानंतर त्या शब्दाबाबत प्रश्न विचारण्यात आला.
शुक्री यांना पत्रकार परिषदेत त्या शब्दाबाबत प्रश्न करण्यात आला. त्यामुळे शुक्री याबाबत माफी मागतील असं अपेक्षित होतं. मात्र त्यांनी त्या शब्दाचा चुकीचा अर्थ घेतल्याचं म्हटलं. “माझा कधीच राग दाखवण्याचा हेतू नव्हता. मला दुसऱ्या शब्दाचा वापर करता आला असता, कारण त्यामुळे लोकांना कोणत्याही माहितीशिवाय आपल्या सोयीने अर्थ घेण्याची संधी मिळाली”, असं म्हणत शुक्री यांनी भारतीयांनाच जबाबदार ठरवलं. तसेच त्यांनी माफी मागण्याची तसदीही घेतली नाही.
“टीम इंडियाला जास्तीत जास्त वेळ मैदानात खेळायला भाग पाडणं आणि परिस्थितीत आव्हानात्मक करण्यात यावी”, असं मला म्हणायचं होतं. मला भविष्यात कोणत्या शब्दांचा उपयोग करतोय याकडे लक्ष ठेवावं लागेल”, असंही शुक्री म्हणाले.
दरम्यान टेम्बा बवुमा याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेने अनेक वर्षांनंतर भारतात टीम इंडिया विरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेने भारताला कोलकातात तिसऱ्याच दिवशी पराभूत केलं. तसेच दश्रिण आफ्रिकेने गुवाहाटीतही टीम इंडियावर मात केली. मात्र भारताने एकदिवसीय मालिका जिंकून टेस्ट सीरिजमधील पराभवाचा वचपा काढला.