
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील दोन सामने पार पडले असून दोन्ही सामन्यात भारताने 350 पार धावा केल्या होत्या. पण एकदा दक्षिण अफ्रिकेचा संघ या धावसंख्येच्या जवळ पोहोचला होता. पण विजयी धावांचं लक्ष्य काही गाठू शकला नाही. तर दुसऱ्यांदा 358 धावांचं लक्ष्य 4 विकेट राखून पूर्ण केलं. दुसऱ्या वनडे सामन्यातील विजयात एडन मार्करमचं शतक महत्त्वपूर्ण ठरलं. दुसरीकडे, मॅथ्यू ब्रीत्झ्के याची खेळीही महत्त्वाची ठरली. त्याने विजयात मोलाचा हातभार लावला. त्याने या सामन्यात 64 चेंडूत 68 धावा केल्या. रांची वनडे सामन्यातही त्याने 80 चेंडूत 72 धावा केल्या होत्या. मॅथ्यू ब्रीत्झ्के याचा पहिलाच भारत दौरा आहे आणि या दौऱ्यात भारतीय गोलंदाजांचा आरामात सामना करत आहे. त्यामुळे इतक्या सहजपणे कसा खेळू शकतो असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. त्याचं उत्तर आता त्याने स्वत:च दिलं आहे.
विशाखापट्टणम येथे तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेला सामोरं जाताना मॅथ्यू ब्रीत्झ्केने या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्याने सांगितलं की, ‘भारतात फलंदाजीचा आनंद लुटत आहे. गोलंदाजांचं मला माहिती नाही. मी पाकिस्तानात खेळून आलो आहे. तिथली खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक नव्हती. पण येथे पाकिस्तानच्या तुलनेत खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली आहे.’ दरम्यान, त्याने दव फॅक्टरही महत्त्वाचं असल्याचं अधोरेखित केलं. दक्षिण अफ्रिकेने दोन्ही सामन्यात धावांचा पाठलाग केला. पण रात्री पडणाऱ्या दवामुळे गोलंदाजी करणं कठीण जात आहे. दुसरीकडे, चेंडू आरामात बॅटवर येत आहे. ब्रीत्झ्केचं म्हणणं ऐकता नाणेफेकीचा कौल तिसऱ्या सामन्यात खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करणं हे फायद्याचं ठरेल असंच दिसत आहे.
ब्रीत्झ्केने सांगितलं की, खालच्या फळीत खेळताना आत्मविश्वास मिळतो. मार्को यानसेन आणि कार्बिन बॉश चांगली फलंदाजी करतात. त्यामुळे टॉपच्या चार फलंदाजाना आक्रमक खेळण्याची संधी मिळते. मॅथ्यू ब्रीत्झ्के सध्या फॉर्मात आहे. त्याने 11 वनडे सामन्यात 682 धावा केल्या आहे. यावेळी त्याने 68.2 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. यात सहा अर्धशतकांचा समावेश आहे.