
भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत व्हावं लागलं. कोलकातातील इडन गार्डन्समधील फिरकीपटूंसाठी फायदेशीर असलेल्या या खेळपट्टीवर टीम इंडियाचे फलंदाज ढेर झाले. दक्षिण आफ्रिकेने भारताला फक्त 124 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेसमोर भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले. दक्षिण आफ्रिकेने भारताला 93 धावांवर गुंडाळलं. दक्षिण आफ्रिकेने यासह 30 धावांनी सामना जिंकला. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. ही मालिका 2 सामन्यांचीच आहे.त्यामुळे भारतासाठी दुसरा आणि अंतिम सामना आरपार आणि प्रतिष्ठेचा झाला आहे.
टीम इंडियाला ही मालिका गमावायची नसेल तर कोणत्याही स्थितीत सामना जिंकावाच लागणार आहे. भारताला न्यूझीलंडकडून मायदेशातच 0-3 फरकाने मालिका गमवावी लागली होती. त्यामुळे टीम इंडियावर मायदेशात काही महिन्यात दुसरी मालिका गमावण्याची टांगती तलवार आहे. त्यामुळे भारताला ही नामुष्की टाळायची असेल तर कोणत्याही स्थितीत विजय मिळवावाच लागणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना हा 22 नोव्हेंबरपासून होणार आहे. हा सामना गुवाहाटीत होणार आहे. दुसर्या सामन्याला पहिल्या सामन्यापेक्षा काही मिनिटांआधी सुरुवात होणार आहे.
कोलकातात पहिल्या कसोटी सामन्याला सकाळी 9 वाजून 30 सुरुवात झाली होती. मात्र कोलकाताच्या तुलनेत गुवाहाटीत 30 मिनिटांआधी नाणेफेक आणि सामना सुरु होणार आहे. गुवाहाटीत 9 वाजता सामना सुरु होईल. तर त्याआधी 8 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत लंच ब्रेक आणि त्यानंतर टी ब्रेक होतो. मात्र गुवाहाटीत यंदा ही परंपरा बदलणार आहे. गुवाहाटीत आधी टी ब्रेक होणार आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात लंचआधी टी ब्रेक होण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे.
गुवाहाटीतील क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सवाचं वातावरण आहे. गुवाहाटीत पहिल्यांदाच कसोटी सामना होणार आहे. त्यामुळे चाहते गुवाहाटीतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी सज्ज आहेत.
भारतीय संघावर पहिल्या सामन्यातील पराभवामुळे जोरदार टीका करण्यात आली. त्यामुळे आता टीम इंडिया दुसरा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेचा हिशोब करण्याच्या हिशोबाने मैदानात उतरणार आहे. त्यामुळे टीम इंडिया या सामन्यात पहिल्या पराभवानंतर कोणत्या रणनितीने मैदानात उतरते? याची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना लागून आहे.