
भारत आणि श्रीलंकेमध्ये पहिला वन डे सामना टाय झाला. यजमान श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 230-8 धावा केल्या. भारताला जिंकण्यासाठी 231 धावांचे आव्हान होते, सलामीला आलेल्या कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी 75 धावांची झकास सुरूवात करून दिली होती. मात्र तरीही भारताला सामना जिंकता आला नाही, श्रीलंकेने सामना नेमका कुठे जिंकला ते जाणून घ्या.
श्रीलंकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा याने 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. भारत एकदम मजबूत स्थितीत होता त्यामुळे हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं. मात्र तसं झालं नाही, 75 धावांवर भारताला पहिला धक्का बसला. शुबमन गिल आऊट झाला त्यापाठोपाठ रोहित शर्माही आऊट झाला. त्यानंतर मैदानात विराट कोहली आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोघे होते. राहुलऐवजी सुंदर आल्याने सर्वांना आश्चर्य वाटलं आणि टीम मॅनेजमेंटचा निर्णयह चुकीचा ठरला कारण तो अवघ्या ५ धावांवर आऊट झाला.
विराट आणि श्रेयस दोघे डाव सांभाळतील असं वाटत होतं. मात्र विराटही २४ धावांवर आऊट झाला. श्रेयस अय्यर २३ धावा काढून परतला. के. एल. राहुल आणि अक्षर पटेल दोघांनीही डाव सांभाळला होता. पण राहुल मोठा फटका मारण्याच्या नादात आऊट झाला. त्यानंतर अक्षर पटेलही ३३ धावांवर आऊट झाला त्यामुळे भारताची भिस्त शिवम दुबे याच्यावर होती.
शिवम दुबे आणि मोहम्मद सिराज मैदाना होते, दोघांनीही सावधपणे खेळ करत भारताला विजयाजवळ आणले होते. सामन्याच्या 48 ओव्हरमध्ये कॅप्टन चरिथ असालंका याने सामना फिरवला. चौथ्या बॉलवर शिवम दुबे याला आऊट करत भारताला नववा झटका दिला. त्यानंतर अर्शदीप सिंहला आऊट करत सामना बरोबरीत सोडवला. तीन सामन्यांच्या मालिका आता 0-0 अशी बरोबरीत आहे.