
टीम इंडियाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये यूनायटेड स्टेटस ऑफ अमेरिकेवर 29 धावांनी मात केली आहे. टीम इंडियाने सूर्याच्या झुंजार खेळीच्या जोरावर यूएसएसमोर 162 धावांचं आव्हान ठेवलं होतं. यूएसएच्या फलंदाजांनीही या धावांचा पाठलाग करताना चांगली झुंज दिली. त्यामुळे यूएसएही सामना जिंकू शकते, असं चित्र काही वेळ पाहायला मिळत होतं. मात्र भारताच्या चिवट आणि धारदार गोलंदाजीसमोर यूएसएला विजय काही मिळवता आला नाही. भारताच्या गोलंदाजांसमोर यूएसएला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 132 धावापर्यंतच पोहचता आलं. भारताने अशाप्रकारे वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात विजयाने केली.
यूएसएचा कॅप्टन मोनांक पटेल याने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. यूएसएच्या गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवला. यूएसएच्या गोलंदाजांनी भारताच्या स्टार फलंदाजांना ढेर केलं. यूएसएच्या गोलंदाजांनी अभिषेक शर्मा आणि शिवम दुबे या दोघांना भोपळाही फोडून दिला नाही. तिलक वर्मा आणि इशान किशन या दोघांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यांना त्या खेळीला मोठ्या आकड्यात बदलता आलं नाही. तिलक 25 आणि इशान 20 धावांवर बाद झाले. हार्दिक पंड्या 5 आणि रिंकु 6 धावा करुन बाद झाले. अक्षरने 14 धावांचं योगदान दिलं. तर अर्शदीपने 4 धावा जोडल्या.
यूएसएच्या गोलंदाजांसमोर फलंदाजांनी गुडघे टेकले. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत आली. मात्र कॅप्टन सूर्यकुमार यादव याने कमाल केली. सूर्याने घरच्या मैदानात खेळताना धमाका केला. सूर्याने 49 चेंडूत नाबाद 84 धावांची खेळी केली. सूर्याने या खेळीत 4 सिक्स आणि 10 फोर मारले. त्यामुळे भारताला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 161 रन्स करता आल्या.
भारतीय गोलंदाजांनी कमाल सुरुवात केली. भारताने यूएसएला पहिल्या 3 ओव्हरमध्ये प्रत्येकी 1-1 असे एकूण 3 झटके दिले. मोहम्मद सिराजने अँड्यू गॉस याला 6 रन्सवर आऊट करत यूएसएला पहिला झटका दिला. अर्शदीप सिंह यानेस कॅप्टन मोनांक पटेल पटेल याला झिरोवर आऊट केला. त्यानंतर सिराजने आपल्या कोट्यातील सलग दुसऱ्या ओव्हरमध्ये साईतेजा मुक्कामल्ला याला आऊट करत दुसरी विकेट मिळवली.
त्यानंतर यूएसएच्या मिडल ऑर्डरने चिवट झुंज दिली. मिलिंद कुमार, संजय कृष्णमुर्ती आणि शुभम रांजने या यूएसएच्या त्रिकुटाने झुंजार खेळी करत सामना एकतर्फी होऊ दिला नाही. मिलिंद, संजय आणि शुभम या तिघांनी अनुक्रमे 34, 37 आणि 37 अशा धावा केल्या. मात्र विजयासाठी या तिघांची खेळी पुरेशी ठरली नाही. तर भारतीय गोलंदाजांनी इतरांना कमी धावांत रोखलं. भारताने अशाप्रकारे हा सामना जिंकला. भारतासाठी मोहम्मद सिराज याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. अर्शदीप सिंह आणि अक्षर पटेल या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर वरुण चक्रवर्थी याने 1 विकेट मिळवली.