
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेतील भारताचा दुसरी कसोटी मालिका वेस्ट इंडिजविरुद्ध होत आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरु आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक गमावल्याने प्रथम गोलंदाजी करावी लागली. पण हा निर्णय भारताच्या पथ्यावर पडला असंच म्हणावं लागेल. कारण वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या दिवशीच बॅकफूटवर गेला. वेस्ट इंडिजने 44.1 षटकांचा सामना केला आणि सर्व विकेट गमावले. वेस्ट इंडिज पहिल्या डावात फक्त 162 धावांपर्यंत मजल मारू शकला. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात आघाडी घेण्याची मोठी संधी आहे. भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 2 गडी गमवून 121 धावा केल्या आहे. अजूनही भारताला पहिल्या डावात बरोबरी करण्यासाठी 41 धावांची आवश्यकता आहे. म्हणजेच 42 व्या धावेपासून आघाडी घेण्यास सुरुवात होणार आहे.
भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी सावध सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. यशस्वी जयस्वाल 54 चेंडूत 7 चौकार मारून 36 धावा करून बाद झाला. त्यानंतर साई सुदर्शन मैदानात आला. खरं तर त्याच्याकडून फार अपेक्षा होत्या. मात्र त्याने अपेक्षा भंग केला. तिसऱ्या क्रमांकावर त्याला काही क्रीडारसिकांची मनं जिंकता आली नाही. या सामन्यात भारताची स्थिती पाहता तसं काही प्रेशर नव्हतं. पण 19 चेंडूंचा सामना करून फक्त 7 धावा करून बाद झाला. त्यानंतर केएल राहुल आणि कर्णधार शुबमन गिल यांनी मोर्चा सांभाळला. या दोघांनी पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 31 धावांची भागीदारी केली.
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा केएल राहुलने 114 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 53 धावा केल्या. तर शुबमन गिल 42 चेंडूंचा सामना करत एका चौकारासह नाबाद 18 धावांवर खेळत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ खऱ्या अर्थाने भारतीय गोलंदाजांनी गाजवला. भेदक माऱ्यापुढे वेस्ट इंडिजच्या फलंदाजांचं काही एक चाललं नाही. मोहम्मद सिराजे 14 षटकं टाकली. यात त्याने 40 धावा देत 4 गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराहने 42 धावा देत 3 गडी बाद केले. कुलदीप यादवने 2, तर वॉशिंग्टन सुंदरने 1 गडी बाद केला.