
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेची सुरुवात टीम इंडियाने चांगली केली आहे. विदेशात खेळलेली इंग्लंड विरुद्धची मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. त्यामुळे टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळाली आहे. आता मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. ही मालिका भारतासाठी खूपच महत्त्वाची आहे. भारत वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेने आपल्या घरच्या हंगामाची सुरुवात करत आहे. या वर्षी भारतीय संघाचा घरच्या मैदानावर हा पहिलाच कसोटी सामना आहे. त्यामुळे या मालिकेकडे लक्ष लागून आहे. कारण मायदेशी खेळलेल्या कसोटी मालिकेत विजयी टक्केवारी वाढवण्याची संधी असते. पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाने खास रणनिती आखली आहे. भारत या सामन्यात तीन फिरकीपटूंसह उतरणार आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजेच आशिया कप स्पर्धेत आपल्या फिरकीवर नाचवण्याऱ्या कुलदीप यादवची संघात एन्ट्री झाली आहे.
कुलदीप यादव 347 दिवसानंतर कसोटी संघात परतला आहे. इंग्लंड दौऱ्यातही कुलदीप यादवची निवड झाली होती. पण पाचही सामने त्याला बेंचवर बसून बघावे लागले होते. कुलदीप यादवने शेवटचा कसोटी सामना 11 महिन्यापूर्वी म्हणजेच मागच्या वर्षी 16 ते 20 ऑक्टोबर दरम्यान न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरुत खेळला होता. त्यानंतर कुलदीप यादव टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये आता सहभागी झाला आहे. कुलदीप यादवसह भारतीय संघात दोन फिरकीपटू आहेत. यात रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरचा समावेश आहे. तर वेगवान गोलंदाजीचा धुरा जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजच्या खांद्यावर आहे. तसेच पेस ऑलराउंडर म्हणून नितीश रेड्डीची संघात एन्ट्री झाली आहे.
भारतीय संघाच्या सलामीची जबाबदारी यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांच्या खांद्यावर असणार आहे. साई सुदर्शन तिसऱ्या क्रमांकावर उतरेल. त्यानंतर कर्णधार शुबमन गिल फलंदाजीला येईल. पाचव्या क्रमांकासाठी ध्रुव जुरेल, सहाव्या क्रमांकावर नितीश रेड्डी आणि सातव्या क्रमांकावर रवींद्र जडेजा फलंदाजीला उतरेल. वॉशिंग्टन सुंदर आठव्या, जसप्रीत बुमराह नवव्या, मोहम्मद सिराज दहाव्या आणि कुलदीप यादव 11व्या क्रमांकवर फलंदाजीला येईल. भारताचा लाइन अप पाहता आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजला अडचणीचं जाईल असं दिसतंय.