‘मानधना पर्वा’ची विजयी सुरुवात! पदार्पणात निकी प्रसादची चमक, दीप्ती शर्माची साथ; ४ विकेट्स पडूनही भारताने झिम्बाब्वेच्या हातून विजय हिसकावला!
India Women vs Zimbabwe Women: भारतीय महिला संघाने शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर विजयासह टी-२० मालिकेची सुरुवात केली आहे. स्मृती मंधानाने आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीची सुरुवात विजयाने केली.

भारतीय महिला क्रिकेट संघाची नवीन कर्णधार स्मृती मंधानाच्या कार्यकाळाची सुरुवात विजयाने झाली आहे. पण हा विजय मिळवण्यासाठी टीम इंडियाला खूप मेहनत घ्यावी लागली. झिम्बाब्वे महिला संघाविरुद्ध खेळताना टीम इंडियाने टी-२० मालिकेतील पहिला सामना ४ गडी राखून जिंकला. प्रथम गोलंदाजी करताना भारतीय संघाने झिम्बाब्वेला ११४ धावांवर रोखले, पण त्यानंतर लक्ष्य गाठताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. युवा पदार्पणकर्ती निकी प्रसादने झुंजार खेळी करून भारताला अनपेक्षित पराभवापासून वाचवले.
रायपूर येथे खेळल्या गेलेल्या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्याने मंधानाच्या पूर्णवेळ भारतीय कर्णधारपदाच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. तिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत झिम्बाब्वेला २० षटकांत केवळ ११४ धावांवर रोखले. झिम्बाब्वेने १० षटकांत १ गडी गमावून ६० धावा करत चांगली सुरुवात केली होती. झिम्बाब्वेसाठी सलामीवीर केलिस न्दलोवूने ४२ धावा केल्या, तर शार्ने मायर्सने नाबाद ४३ धावा केल्या.
मात्र भारतीय गोलंदाजांनी पुढील १० षटकांत आपला हल्ला रोखून धरला. परिणामी एकेकाळी ३० चेंडूंमध्ये ४२ धावा करणाऱ्या न्दलोवूला पुढील सलग १४ चेंडूंमध्ये एकही धाव करता आली नाही. भारतासाठी वेगवान गोलंदाज नंदनी शर्माने दोन बळी घेतले, तर क्रांती गौड, अरुंधती रेड्डी आणि श्री चरानी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. जेव्हा भारतीय संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला, तेव्हा असे वाटत होते की भारतीय संघ १०-१२ षटकांतच लक्ष्य गाठेल, पण अवघ्या १९ चेंडूंमध्ये जे घडले त्याने सर्वांना चकित केले.
वेगवान गोलंदाज न्याशा ग्वांजुराने कहर केला. तिने अवघ्या १९ धावांत चार बळी घेतले. यामध्ये कर्णधार मंधाना, नवीन उपकर्णधार शफाली वर्मा, माजी कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अनुष्का शर्मा यांचा समावेश होता. या गोलंदाजाने यापैकी तीन बळी घेतले. झिम्बाब्वे अनपेक्षित विजय मिळवून इतिहास रचेल अशी भीतीचे ढग दाटून येऊ लागले होते. पण निक्की प्रसाद आणि दीप्ती शर्मा यांच्या भागीदारीमुळे तसे घडले नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या २० वर्षीय निक्कीने (३९ नाबाद) अनुभवी अष्टपैलू दीप्तीला (४९) साथ दिली आणि या दोघींनी ६३ चेंडूंमध्ये ८२ धावा जोडून विजय निश्चित केला. भारताने अखेरीस १५.४ षटकांत ६ गडी गमावून लक्ष्य गाठले.