
इंडिया ए टीमने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात 3 सामन्यांच्या अनऑफिशियल वनडे सीरिजची दणक्यात सुरुवात केली आहे. इंडिया ए ने ऑस्ट्रेलिया ए संघाचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात एकतर्फी फरकाने धुव्वा उडवत विजयी सलामी दिली. उभयसंघातील सलामीचा सामना कानपूरमधील ग्रीन पार्क स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. भारताने या सामन्यात आधी श्रेयस अय्यर आणि प्रियांश आर्य या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर 400 पार मजल मारली. त्यानंतर कांगारुंना 250 धावांच्या आत गुंडाळून विजय मिळवला. भारताने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. उभयसंघातील हा सामना 30 सप्टेंबरला होणार होता. मात्र पावसामुळे हा सामना 1 ऑक्टोबरला खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.
सलामीच्या सामन्यात भारताच्या विरोधात नाणेफेकीचा कौल लागला. त्यामुळे भारताला पहिले बॅटिंगसाठी भाग पाडण्यात आलं. मात्र भारताने या संधीचा पूर्ण फायदा घेत 400 पेक्षा अधिक धावांचा डोंगर उभा केला. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 413 धावा केल्या. टीम इंडियासाठी प्रियांश आर्य आणि श्रेयस अय्यर या दोघांनी शतक झळकावलं. आयपीएलमध्ये एकाच संघाकडून खेळणाऱ्या या दोघांनी कांगारुंची धुलाई केली. या जोडीने केलेल्या शतकी खेळीमुळे इंडिया ए टीमला लिस्ट ए क्रिकेटमध्ये तिसऱ्यांदा 400 पेक्षा अधिक धावा करता आल्या.
टीम इंडियासाठी कॅप्टन श्रेयस अय्यर याने सर्वाधिक धावा केल्या. श्रेयसने 83 बॉलमध्ये 110 रन्स केल्या. श्रेयसने या 110 पैकी 72 धावा एकाच जागेवर उभं राहत चौकार आणि षटकारांच्या मदतीने पूर्ण केलं. श्रेयसने 4 षटकार आणि 12 चौकार लगावले. तर प्रियांशने 11 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 84 चेंडूत 101 रन्स केल्या.
तसेच श्रेयस आणि प्रियांश व्यतिरिक्त इतरांनीही योगदान दिलं. प्रभसिमरन सिंह, रियान पराग आणि आयुष बडोनी या त्रिकुटाने अर्धशतकी खेळी साकारली. प्रभने 56 आणि रियानने 67 धावा केल्या. तर अखेरच्या क्षणी आयुषने फटकेबाजी करच 27 बॉलमध्ये 50 रन्स केल्या. त्यामुळे 400 पार पोहचता आलं. ऑस्ट्रेलियासाठी एकूण 7 जणांनी बॉलिंग केली. मात्र त्यापैकी एकही गोलंदाज भारतीय फलंदाजांना रोखण्यात यशस्वी ठरला नाही.
विजयी धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची आश्वासक सुरुवात झाली होती. मात्र फलंदाजांनी धावांचा डोंगर उभारल्यानंतर भारतीय गोलंदाजांनीही कमाल केली. भारताने कांगारुंना 35 ओव्हरच्या आतच रोखत सामना झटपट संपवला. ऑस्ट्रेलियाने 20 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 150 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर टीम इंडियाने कमाल केली. टीम इंडियाने कांगारुंना 33.1 ओव्हरमध्ये 242 रन्सवर ऑलआउट केलं.
टीम इंडियासाठी निशांत सिंधु याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. रवी बिश्नोई याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत ऑस्ट्रेलियाला गुंडाळण्यात योगदान दिलं. आता उभयसंघातील दुसरा सामना हा शुक्रवारी 3 ऑक्टोबरला होणार आहे.