के एल राहुलकडे विकेटकीपिंगची धुरा, सराव सामन्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर

| Updated on: Jul 16, 2021 | 9:12 AM

भारताला इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. भारतीय संघ 4 ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र त्याआधी भारताला सराव सामना खेळायचा आहे.

के एल राहुलकडे विकेटकीपिंगची धुरा, सराव सामन्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर
के एल राहुल
Follow us on

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघात कोरोनाने शिरकाव केला आहे. भारताचा विकेटकीपर ऋषभ पंत डेल्टा व्हेरिएंटच्या कचाट्यात सापडला आहे. तो क्वारंटाईन झाला आहे. भारताला इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. भारतीय संघ 4 ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र त्याआधी भारताला सराव सामना खेळायचा आहे. काऊंटी इलेव्हन (County XI) विरुद्ध 20 जुलैपासून तीन दिवसीय हा सराव सामना होणार आहे. या सामन्यासाठी काऊंटी इलेव्हनचा संघ जाहीर झाला आहे.

इंग्लंडच्या विविध काऊंटी खेळाडूंची यामध्ये निवड झाली आहे. विल रोड्सकडे काऊंटी इलेव्हन संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी कोणताही सराव सामना नियोजित नव्हता. मात्र इंग्लंड आणि भारतीय क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन, एक सराव सामना खेळवण्याचं निश्चित केलं. त्यानुसार 20 जुलैला हा सामना होत आहे.

सध्या इंग्लंडमध्ये काऊंटी चॅम्पियनशीप सुरु आहे. त्यामुळे कोणत्याही एका काऊंटी संघाविरुद्ध मॅच होणे कठीण आहे. त्यामुळे विविध संघातील खेळाडू एकत्र करुन काऊंटी इलेव्हन हा संघ बनवण्यात आला आहे.

भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव

इंग्लंडच्या संघात मागील आठवड्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून भारतीय संघाची कोरोना टेस्ट करण्यात आली. यावेळी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला (Rishabh Pant) कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतर खेळाडूंप्रमाणे ऋषभही मागील काही दिवस इंग्लंडमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत होता. ऋषभ लंडनमध्येच त्याच्या एका नातेवाईकाच्या घरी विलगीकरणात आहे. त्यामुळे गुरुवारी डरहमला जाणाऱ्या भारतीय संघासोबत तो जाणार नाही.

दुसरीकडे सपोर्ट स्टाफ दयानंद जारानी यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, विकेटकीपर रिद्धिमान साहा आणि स्टँडबाय सलामी फलंदाज अभिमन्यू ईश्वर यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

के एल राहुलकडे विकेटकीपिंगची धुरा

ऋषभ पंत आणि रिद्धिमान साहा संघाबाहेर असल्याने, आता के एल राहुलला विकेटकीपिंग करावी लागणार आहे. काऊंटी संघाविरुद्धच्या सराव सामन्यात राहुल विकेटकीपिंग करणार आहे. यापूर्वी सलामीचा फलंदाज शुभमन गिल दुखापतीमुळे मालिकेबाहेरच पडला आहे.

काऊंटी इलेव्हन संघ

विल रोड्स (कर्णधार), रेहान अहमद, टॉम एस्पिनवेल, ईथन बाम्बर, जेम्स ब्रेसी, जॅक कार्सन, जॅक चॅपल, हसीब हमीद, लिंडन जेम्स, जेक लिब्बी, क्रेग माईल्स, लियाम पेटरसन व्हाइट, जेम्स रु, रॉब येट्स.

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 4 ते 8 ऑगस्ट

दुसरी कसोटी, 12 ते 16 ऑगस्ट

तिसरी कसोटी, 25 ते 29 ऑगस्ट

चौथी कसोटी, 2 ते 6 सप्टेंबर

पाचवी कसोटी, 10 ते 14 सप्टेंबर.

अशी आहे टीम इंडिया :

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव. केएल राहुल आणि वृद्धिमान साहा

राखीव खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अर्जान नाग्वासवाला.

संबंधित बातम्या 

भारतीय संघावर कोरोनाचा घाला, पंत पाठोपाठ आणखी एकाला कोरोनाची बाधा, तर तिघेजण विलगीकरणात

मोठी बातमी : ऋषभ पंतला कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग, टीम इंडियाला मोठा झटका, आता कीपर कोण?

India vs England 2021 County XI team announced Will Rhodes captain against team India practice match