
आशिया कप 2025 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताने युएईचा धुव्वा उडवला. हा सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. क्रीडाप्रेमींच्या मते तर युएईला दोनदा फलंदाजी देणं आवश्यक होतं. हा गंमतीचा भाग सोडला तर भारताने पहिल्याच सामन्यात आपलं वरचष्मा दाखवला. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर भारताने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. फलंदाजीला आलेल्या युएई संघाचा कुलदीप यादव, शिवम दुबे आणि जसप्रीत बुमराहसमोर निभाव लागला नाही. भारतीय गोलंदाजांचा प्रभावी मारा पाहता युएईच्या फलंदाजांनी नांगी टाकली. पण या सामन्यात एक विषय चर्चेचा राहिला. सूर्यकुमार यादवच्या एका निर्णयाने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. युएईचा फलंदाज रनआऊट झाला होता. तसेच पंचांनी त्याला बादही घोषित केलं होतं. पण सूर्यकुमार यादवने हा निर्णय मान्य केला नाही. त्यामुळे युएईच्या फलंदाजाला पुन्हा खेळण्याची संधी मिळाली.
भारताकडून 13 वं षटक टाकण्यासाठी शिवम दुबे आला होता. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर युएईची आठवी विकेट पडली. शिवम दुबेच्या गोलंदाजीवर ध्रुव पराशर पायचीत झाला होता. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर असं काही झालं की रनआऊटवरून ड्रामा पाहायला मिळाला. शिवम दुबेने पराशरला बाउंसर टाकला. हा चेंडू पूल मारण्याच्या नादात चुकला. थेट विकेटकीपर संजू सॅमसनच्या हाती गेला. संजू सॅमसनने चेंडू हातात येताच स्टंपच्या दिशेने मारला. बेल्स उडाल्यानंतर टीम इंडियाने अपली केली. तेव्हा मैदानी पंचांनी अपीलसाठी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. रिप्ले पाहिल्यानंतर पराशर बाद असल्याच स्पष्ट झालं.
Captain Suryakumar Yadav recalled the batter even after he was declared out. pic.twitter.com/tIdZG2LIfT
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 10, 2025
पंचांच्या निर्णयानंतर युएईच्या फलंदाजाने क्रीज काही सोडली नाही. कारण सूर्यकुमार यादव पंचांशी काहीतरी बोलत होता. त्याने रनआऊटसाठी केलेली अपील मागे घेतली. याचं कारण शिवम दुबे होता. चेंडू टाकण्यासाठी धावत असताना त्याचा रुमाल खाली पडला होता. शॉट मारताना चुकल्यानंतर पराशरने पंचांकडे तक्रार केली. या गडबडीत क्रीझवर परतण्याची चूक केली. अशा स्थितीत फलंदाजाचं लक्ष विचलित होते आणि क्रिझवर परतण्याचं विसरून जातो. त्यामुळे पंच डेड बॉल देतात. पण यावेळी फलंदाज बाजूला झाला नाही आणि पंचांनी डेड बॉल दिला नाही. त्यामुळे भारतीय कर्णधार सूर्यकुमारने त्याची तक्रार योग्य मानत अपील मागे घेतली.