
आशिया कप 2025 स्पर्धेला आता अवघे काही दिवसच बाकी आहेत. या स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना हा 28 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेनिमित्ताने पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांचं भारतीय संघाच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. टीम इंडिया गतविजेता आहे. मात्र यंदा टी 20 फॉर्मेटने ही स्पर्धा होणार आहे. सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. टीम इंडिया महिन्याभराच्या विश्रांतीनंतर आशिया कप स्पर्धेच्या निमित्ताने मैदानात उतरणार आहे. त्यामुळे भारतीय संघाकडून चाहत्यांना चमकदार कामिगिरीची अपेक्षा असणार आहे. आशिया कप जिंकण्यासाठी टीम इंडिया सरावाला 5 दिवसांआधी सुरुवात करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
भारतीय संघ आशिया कप मोहिमेतील आपला पहिला सामना हा स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी अर्थात 10 सप्टेंबरला यजमान यूएई विरुद्ध खेळणार आहे. टी 20 टीम इंडिया यासह 7 महिन्याने मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाने अखेरचा टी 20 सामना फेब्रुवारी महिन्यात खेळला होता. त्यानंतर भारतीय खेळाडू आयपीएल 2025 मध्ये सहभागी झाले होते. तर शुबमन गिल आणि जसप्रीत बुमराह ही जोडी इंग्लंड दौरा आटोपून भारतात आले आहेत. त्यामुळे इतर खेळाडूंसमोर दमदार कामिगरी करुन लय प्राप्त करण्याचं आव्हान असणार आहे.
खेळाडूंना मोठ्या विश्रांतीनंतर लय प्राप्त व्हावी यासाठी दुबईतील आयसीसी अकादमीत सराव शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. दुबईत आल्यानंतर बहुतांश संघ याच ठिकाणी सराव करतात. भारतीय संघाच्या सरावाला 5 सप्टेंबरपासून सुरुवात होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
रेव्हस्पोर्ट्सनुसार, टीम इंडिया थेट दुबईला जाईल. भारतीय संघ 5 सप्टेंबरपासून सरावाला सुरुवात करेल. आशिया कप स्पर्धेतील सर्व सामने हे दुबई आणि अबुधाबीत आयोजित करण्यात आले आहेत. भारताचे साखळी फेरीतील 3 पैकी 2 सामने हे दुबईत होणार आहेत.
दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सरावाला अवघ्या काही तासांनी सुरुवात होणार आहे. पाकिस्तान या स्पर्धेत सलमान अली आगाह याच्या नेतृत्वात खेळणार आहे. पाकिस्तान दुबईतील आयसीसी अकादमीत 22 ते 25 ऑगस्ट दरम्यान सराव करणार. त्यानंतर पाकिस्तान यूएईत ट्राय सीरिज खेळणार आहे. या ट्राय सीरिजमध्ये पाकिस्तान व्यतिरिक्त यूएई आणि अफगाणिस्तान सहभागी होणार आहेत. या ट्राय सीरिजमुळे आशिया कप स्पर्धत या तिन्ही संघांना किती फायदा होतो? याकडेही क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.