IPL 2022: रोजचा सायकलवरुन 50 किमी प्रवास, अक्रमचे VIDEO पाहून गोलंदाजी शिकला, अखेर टीम इंडियात झाली निवड

| Updated on: May 23, 2022 | 2:32 PM

भारतात क्रिकेटच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवणं सोप नाहीय. साध्या क्लब लेव्हलच्या टीममध्येही स्थान मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागतो. राष्ट्रीय संघापर्यंत पोहचणारा क्रिकेटपटू बरेच संघर्ष, मेहनतीतून घडलेला असतो.

IPL 2022: रोजचा सायकलवरुन 50 किमी प्रवास, अक्रमचे VIDEO पाहून गोलंदाजी शिकला, अखेर टीम इंडियात झाली निवड
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: भारतात क्रिकेटच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवणं सोप नाहीय. साध्या क्लब लेव्हलच्या टीममध्येही स्थान मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागतो. राष्ट्रीय संघापर्यंत पोहचणारा क्रिकेटपटू बरेच संघर्ष, मेहनतीतून घडलेला असतो. त्याच्यासाठी हा प्रवास सोपा नसतो. पंजाब किंग्सकडून (Punjab kings) खेळणारा अर्शदीप सिंह (Arshdeep singh) अशाच क्रिकेटपटूंमध्ये येतो. आज संघर्ष, प्रयत्न आणि मेहनतीने त्याने भारतीय संघापर्यंत (Team India) धडक मारली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी अर्शदीपची टीम इंडियात निवड झाली आहे. एकदिवस भारतीय संघातून खेळायचं, ही जिद्द त्याच्या मनात होती. त्यामुळेच तो दररोज सायकलवरुन 50 किमी पर्यंतचा प्रवास करायचा. अर्शदीप हा आयपीएलमधून समोर आलेला खेळाडू आहे. या सीजनमध्ये नाही, तर मागच्या सीजनमध्येच त्याने लक्ष वेधून घेतलं होतं. पण संधी त्याला आता मिळाली आहे.

डेथ ओव्हर्समध्ये प्रभावी गोलंदाज

अर्शदीप सिंह डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. डेथ ओव्हर्समध्ये किफायती गोलंदाजीसाठी तो ओळखला जातो. पंजाब किंग्सने आयपीएल 2022 मेगा ऑक्शनआधी त्याला रिटेन केलं होतं. या सीजनमध्ये पंजाबचा संघ सहाव्या स्थानावर राहिला. पण अर्शदीपने आपली छाप उमटवली.

त्याच्या यॉर्कर चेंडूंना तर तोड नाहीय

अर्शदीपला IPL 2022 मध्ये जास्त विकेट मिळाले नाहीत. पण त्याने किफायती गोलंदाजी केली. जास्त धावा दिल्या नाहीत. त्याने या सीजनमध्ये 14 सामन्यात 10 विकेट घेतल्यात. टी 20 क्रिकेटमध्ये शेवटच्या हाणामारीच्या षटकात फटकेबाजी होते. अर्शदीप तिथेच उजवा ठरतो. तो सहजासहजी धावा देत नाही. त्याच्या यॉर्कर चेंडूंना तर तोड नाहीय. या सीजनमध्ये त्याने डेथ ओव्हर्समध्ये टिच्चून गोलंदाजी केली व विकेटही काढल्या. त्यामुळे निवड समितीचं लक्ष त्याच्याकडे वळलं.

अक्रमचा बाऊन्सर दाखवला

“अर्शदीपला मी वसीम अक्रमच्या गोलंदाजीचे व्हिडिओ दाखवून गोलंदाजीचे धडे दिले आहेत. मी त्याला अक्रमचा बाऊन्सर दाखवलाय़. अक्रम ज्या प्रमाणे गोलंदाजी करताना क्रीझचा वापर करायचा, ते सर्व मी त्याला शिकवलय” असं अर्शदीपचे बालपणीचे कोच जसवंत राय यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं. अर्शदीपचं घर पंजाब खरडमध्ये आहे. त्याने चंदीगडच्या जसवंत राय अकादमीत प्रवेश घेतला होता. खरड ते चंदीगड हे अंतर 25 किमी आहे. अर्शदीप रोज सायकलवरुन खरड ते चंदीगड प्रवास करायचा, असं जसवंत राय यांनी सांगितलं.