
आयपीएल 2024 स्पर्धेच्या जेतेपदावर कोलकाता नाईट रायडर्सने नाव कोरलं. साखळी फेरीतही अव्वल स्थानी राहिली आणि प्लेऑफमध्ये विजयी घोडदौड कायम ठेवली. खासकरून प्लेऑफच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा हुकमी एक्का चालला. खऱ्या अर्थाना कोलकाता नाईट रायडर्सचे 24.75 कोटी रुपये वसूल झाले असं म्हणायला हरकत नाही. या स्पर्धेपूर्वी झालेल्या मिनी लिलावात मिचेल स्टार्कसाठी सर्वाधिक रक्कम मोजली गेली. गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात त्याच्यासाठी चढाओढ लागली होती. पण गौतम गंभीर मागे हटत नसल्याचं पाहून आशिष नेहराने काढता पाय घेतला. मिचेल स्टार्कसाठी आयपीएल इतिहासातील सर्वाधिक बोली लागली. आतापर्यंत सर्व रेकॉर्ड मिचेल स्टार्कने मोडीत काढले होते. पण साखळी फेरीत मिचेल स्टार्ककडून हवी तशी कामगिरी झाली नाही. पहिल्याच सामन्यात चार षटकांचा महागडा स्पेल टाकला. तसेच विकेट घेण्यात अपयशी ठरला. पण मिचेल स्टार्क हा मोठ्या सामन्यांचा खेळाडू आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं. कोलकात्याचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आणि मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीला धार चढली. अंतिम फेरीतील स्पेलनंतर मिचेल स्टार्कने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.
“कोलकात्यासाठी आजची खूप छान आहे. दोन तगड्या टीम अंतिम फेरीत होत्या. आमच्या संघातील गोलंदाज आणि फलंदाज या दोन्ही बाजू भक्कम होत्या. प्रत्येक खेळाडूंनी आपली भूमिका चोखपणे बजावली. आम्ही नाणेफेक हरलो आणि प्रथम गोलंदाजी आली. श्रेयसने खरंच खूप छान कर्णधारपद भूषवलं. गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण योग्य पद्धतीने लावलं. याचं क्रेडीट पूर्णपणे त्याला जातं.”, असं मिचेल स्टार्क म्हणाला. “माझ्यासाठी कोट्यवधी रुपये मोजले हे अनेकजण हसण्यावर नेत होते. टिंगलही झाली. मी बऱ्याच वर्षांपूर्वी आयपीएल खेळलो होतो. मला अनुभव होता आणि त्या अनुभवाचा मला फायदा झाला. मला आनंद आहे की अनुभवी वयस्कर आहे.”, असंही स्टार्कने पुढे सांगितलं.
मिचेल स्टार्कने क्वॉलिफायर 1 आणि अंतिम फेरीत सनरायझर्स हैदराबादचं कंबरडं मोडलं. क्वॉलिफायर 1 मधील त्याचा स्पेल पाहून ट्रेव्हिस हेड त्याला पहिल्या षटकात सामोरा गेला नाही. पण मिचेल स्टार्कने त्याची भूमिका चोख बजावली. अभिषेक शर्माला बाद करत चांगली सुरुवात करून दिली. त्या विकेटनंतर हैदराबाद डोकं वर काढण्याची संधी मिळाली नाही. मिचेल स्टार्कने 3 षटकात 14 धावा देत 2 गडी बाद केले. पण हे दोन्ही गडी खूपच महत्त्वाचे होते.