IPL 2024, MI vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं मुंबईसमोर 197 धावांचं आव्हान

आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना सुरु आहे. नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. आरसीबीने विकेट्स गमवून 196 धावा केल्या आहेत. विजयासाठी 197 धावांचं आव्हान आहे.

IPL 2024, MI vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं मुंबईसमोर 197 धावांचं आव्हान
| Updated on: Apr 11, 2024 | 9:38 PM

आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल मुंबईने जिंकला आणि हार्दिक पांड्याने क्षणाचाही विलंब न करत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. आरसीबीने 20 षटकात 8 गडी गमवून 196 धावा केल्या आणि विजयासाठी 197 धावा दिल्या आहेत. या सामन्यात बंगळुरुची सुरुवात निराशाजनक राहिली. विराट कोहली स्वस्तात बाद झाला. तीन धावांवर असताना जसप्रीत बुमराहने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर आलेला विल जॅक्सही काही खास करू शकला नाही. 8 धावांवर असताना आकाश मढवालने त्याला बाद केलं. त्यानंतर फाफ डू प्लेसिस आणि रजत पाटिदार यांनी डाव सावरला. दोघांनी 82 धावांची भागीदारी केली. यात रजत पाटिदारने 236 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर गेराल्ड कोएत्झीने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. 4 चेंडू खेळून श्रेयस गोपाळने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.

आरसीबी कर्णधार फाफने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. 40 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. मात्र बुमराहच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करण्याचा नादात विकेट देऊन बसला. त्यानंतर आलेला महिपाल लोमरोर तर खातंही खोलू शकला नाही. जसप्रीत बुमराहने सौरव चौहान आणि विजयकुमार विशक यांना एकापाठोपाठ करत तंबूत पाठवलं. जसप्रीत बुमराहने 4 षटकात 21 धावा देत 5 गडी बाद केले.

दुसरीकडे, दिनेश कार्तिकने वादळी खेळी केली. 22 चेंडूत अर्धशतक ठोकलं. त्यामुळे मुंबई इंडियन्ससमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. तर आकाश मढवाल हा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 4 षटकात 57 धावा देत 1 गडी बाद केला.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, आकाश मढवाल.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, रीस टोपले, विजयकुमार विषक, मोहम्मद सिराज, आकाश दीप.