IPL 2024, PBKS vs GT : पंजाब किंग्सचा डाव 142 धावांवर आटोपला, गुजरातसमोर सोपं आव्हान

| Updated on: Apr 21, 2024 | 9:18 PM

आयपीएल 2024 स्पर्धेतील 37 वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यात पंजाब किंग्सने 20 षटकात 9 गडी गमवून 142 धावा केल्या. तसेच विजयासाठी 143 धावांचं आव्हान दिलं आहे. आता हे आव्हान गुजरात टायटन्स किती षटकात गाठते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

IPL 2024, PBKS vs GT : पंजाब किंग्सचा डाव 142 धावांवर आटोपला, गुजरातसमोर सोपं आव्हान
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेतील 37 वा पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने लागला. मात्र कर्णधार सॅम करनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा गुजरात टायटन्सच्या पथ्यावर पडला. खऱ्या अर्थाने कर्णधार शुबमन गिलच्या मनासारखं झालं. कर्णधार सॅम करन आणि प्रभसिमरन सिंग यांनी चांगली सुरुवात करून दिली. सुरुवातीच्या पाच षटकात एकही गडी न गमावता 50 धावांची भागीदारी केली होती. मात्र त्यानंतर पंजाब किंग्स डाव गडगडला. प्रभसिमरन सिंग 35 धावांवर असताना बाद झाला आणि येथून पुढे गळती लागली. एका पाठोपाठ एक विकेट्स पडत गेल्या त्यामुळे धावगती मंदावली. रिली रोस्सो 9 धावांवर, सॅम करन 20 धावांवर, जितेश शर्मा 13 धावांवर, लियाम लिविंगस्टोन 6 धावांवर, आशुतोष शर्मा 7, शशांक सिंग 8 धावा करून बाद झाले. यामुळे पंजाबची स्थिती एकदमच नाजुक झाली. हरप्रीत ब्रारने शेवटी फटकेबाजी करत 12 चेंडूत 29 धावा केल्या. यात 4 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. पंजाब किंग्सने 20 षटकात 9 गडी 142 धावा केल्या आणि विजयासाठी 143 धावांचं आव्हान दिलं.

पंजाब किंग्सला आता विजयासाठी दिलेलं आव्हान रोखण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. आता गोलंदाज विजयासाठी दिलेलं आव्हान रोखणार का? असा प्रश्न आहे. या सामन्यात पंजाब किंग्सचा पराभव झाला तर प्लेऑफचं गणित खूपच किचकट होणार आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यात पंजाब किंग्सला गुणांसह धावगती राखणंही महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे हा सामना सहजासहजी गमवून चालणार नाही. गुजरात टायटन्सला सर्वस्वी पणाला लावून पराभूत करावं लागेल. दुसरीकडे, गुजरातने पंजाबला पराभूत केल्यास गुणतालिकेत 8 गुण होतील. तसेच प्लेऑफच्या शर्यतीत एक पाऊल पुढे टाकणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): सॅम कुरन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, रिली रोसो, लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा(विकेटकीपर), शुभमन गिल(कर्णधार), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, संदीप वॉरियर, मोहित शर्मा.