IPL 2024, RR vs DC : नाणेफेकीचा कौल राजस्थानच्या बाजूने, संजू सॅमसन गोलंदाजी घेत प्लेइंग 11 बाबत म्हणाला..

आयपीएल 2024 स्पर्धेतील 56 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे. हा सामना दिल्लीसाठी खूपच महत्त्वाचा आहे. तर राजस्थान रॉयल्सने हा सामना जिंकला तर प्लेऑफसाठी अधिकृतरित्या पात्र होणारा पहिला संघ ठरेल. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण बाजी मारते याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

IPL 2024, RR vs DC : नाणेफेकीचा कौल राजस्थानच्या बाजूने, संजू सॅमसन गोलंदाजी घेत प्लेइंग 11 बाबत म्हणाला..
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 07, 2024 | 7:10 PM

आयपीएल 2024 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सला 12 धावांनी पराभूत केलं होतं. आता आजच्या सामन्यात कोण कोणावर भारी पडतं याची उत्सुकता आहे. गुणतालिकेत राजस्थानचा संघ 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघ 10 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. दिल्लीला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी उर्वरित तिन्ही सामन्यात विजय मिळवणं गरजेचं आहे. दुसरीकडे, राजस्थानचं प्लेऑफचं जवळपास निश्चित झालं आहे. पण औपचारिकता उरली असून या सामन्यातील विजयानंतर त्यावर मोहोर लागेल. दरम्यान नाणेफेकीचा कौल राजस्थान रॉयल्सच्या बाजूने लागला. कर्णधार संजू सॅमसनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. संजू सॅमसन म्हणाला की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करू इच्छितो. पाठलाग करण्यासाठी चांगली विकेट दिसते. आम्ही दोन्ही गोष्टी करण्यास सोयीस्कर आहोत. संघातील वातावरण मला आनंदित करते, आमच्याकडे उत्कृष्ट खेळाडू आहेत, अर्थातच जिंकण्यात मदत होते. ध्रुव आणि हेटमायर अनुपलब्ध आहेत. त्यांच्याऐवजी दुबे आणि डोनोव्हन आहेत.”

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, “या मोसमातील खेळपट्ट्या फलंदाजीला अनुकूल आहेत. आमच्या संघात काही दुखापती, आरोग्याच्या समस्या आहेत. पण आम्हाला त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचे नाही आणि आम्हाला सामन्यांवर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि आमचे सर्वोत्तम प्रयत्न करावे लागतील. या सामन्यात इशांत आणि गुलबदिन प्लेइंग इलेव्हनमध्ये असतील.” गुलबदिन नायब आणि डोनोव्हान फरेरा हे दोन परदेशी आयपीएल डेब्यू करणारे खेळाडू आहेत.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/ कर्णधार), रियान पराग, डोनोवन फरेरा, रोवमन पॉवेल, शुभम दुबे, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, गुलबदिन नायब, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद