
आयपीएल 2025 स्पर्धेत साई सुदर्शनच्या फॉर्मची चर्चा होत आहे. कारण आतापर्यंत खेळलेल्या प्रत्येक सामन्यात त्याने फलंदाजीत योगदान दिलं आहे. गुजरात टायटन्सला त्याच्या फॉर्माचा जबरदस्त फायदा होताना दिसत आहे. गुजरात टायटन्स संघ गुणतालिकेत टॉपला असून फक्त तीन सामन्यात विजय मिळवला की प्लेऑफमधील स्थान पक्क होणार आहे. असं असताना गुजरात टायटन्सच्या सलामीचा फलंदाज साई सुदर्शनच्या डोक्यावर ऑरेंज कॅपचा साज चढला आहे. त्याने लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार निकोलस पूरनला मागे टाकलं आहे. साई सुदर्शनने आठ सामन्यात फलंदाजी केली आणि 152.18 च्या स्ट्राईक रेटने 417 धावा केल्या आहेत. यात त्याने 5 अर्धशतकं ठोकली आहे. तसेच 42 चौकार आणि 15 षटकार मारले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्यात चार धावा काढताच त्याला ऑरेंज कॅपचा मान मिळवला आहे.
कोलकात्याविरुद्धच्या सामन्यापूर्वी साई सुदर्शन दुसऱ्या स्थानावर होता. त्याने 7 सामन्यात 365 धावा केल्या होत्या. तर लखनौ सुपर जायंट्सच्या निकोलस पूरनच्या नावावर 8 सामन्यात 368 धावा होत्या. त्याला मागे टाकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज होती. त्याने या धावा केल्या आणि निकोलस पूरनला मागे टाकलं. आता ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहे. या दोघांमधील अंतर 49 धावांचं आहे. त्यामुळे पुढच्या काही सामन्यात ऑरेंज कॅप साई सुदर्शनच्या डोक्यावर असेल असं वाटते. कारण पुढच्या सामन्यात निकोलस पूरनला अर्धशतकी खेळी करणं भाग आहे. जर त्याला यश आलं नाही तर आठवडाभर ही कॅप साई सुदर्शनकडेच राहू शकते. त्यात पुढच्या सामन्यातही साई सुदर्शन मोठी खेळी केली तर आणखी पुढे निघून जाईल.
गुजरात टायटन्सचा जोस बटलर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 8 सामन्यात 165.58 च्या स्ट्राईक रेटने 356 धाव केल्या आहेत. त्याने तीन अर्धशतकं ठोकलं आहे. चौथ्या स्थानावर मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव आहे. त्याने 8 सामन्यात 162.43 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. पाचव्या स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विराट कोहली पाचव्या स्थानावर आहे. त्याने 8 सामन्यात 140 च्या स्ट्राईक रेटने 322 धावा केल्या.