IPL 2025 : शुबमन गिल लग्न करणार आहेस का? समालोचकाने नाणेफेकीनंतर प्रश्न विचारताच दिलं असं उत्तर
आयपीएल 2025 स्पर्धेत गुजरात टायटन्स कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वात चांगली कामगिरी करत आहे. प्लेऑफमधील स्थान निश्चित करण्याच्या अगदी जवळ आहेत. असं असताना सर्वत्र गुजरात टायटन्स आणि शुबमन गिलची चर्चा होत आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही बरंच काही घडत आहे. असं असताना त्याला लग्नाबाबत थेट प्रश्न विचारला गेला.

आयपीएल 2025 स्पर्धेत शुबमन गिलचे नेतृत्व गुण स्पष्ट दिसून आले आहेत. त्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने यशाचं शिखर गाठताना दिसत आहे. स्पर्धेतील 39वा सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर शुबमन गिलला एका प्रश्नाची गुगली टाकण्यात आली. त्यामुळे उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. आयपीएल टॉस प्रेझेंटर डॅनी मॉरिसन कर्णधारांना अनेकदा विचित्र प्रश्न विचारून बुचकळ्यात टाकतात. यावेळी त्यांनी कर्णधार शुबमन गिलला एक छोटासा प्रश्न विचारला आणि सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. मॉरिसनने थेट लग्नाबाबत प्रश्न विचारून टाकला. मॉरिसनने गिलला विचारल की, ‘तू आज चांगला दिसत आहे. लग्नाचा करण्याचा प्लान आहे का? तू लवकरच लग्न करणार आहेस का?’ शुबमन गिलच्या लग्न आणि अफेअरबाबत अनेक अफवा सोशल मीडियावर असतात. इंस्टाग्रामवर फॉलो किंवा अनफॉलो केलं तरी चर्चांना उधाण येत असतं. नुकतंच सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांनी एकमेकांना अनफॉलो केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
मॉरिसनने या प्रश्नाची गुगली टाकल्यानंतर त्याचं उत्तर काय असेल याची उत्सुकता क्षणात वाढली. पण शुबमन गिलने एकदम शांत आणि हसत उत्तर दिलं की, ‘नाही, असं काहीच नाही.’ नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर गुजरात टायटन्सच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. त्यावर शुबमन गिलने सांगितलं की, ‘मला वाटत नाही की दव पडेल. जर आपण चांगली धावसंख्या नोंदवली तर तो सामना चांगला होईल. आमची गोलंदाजी, प्रत्येकजण विकेट्समध्ये योगदान देत आहे. आम्ही विकेट्स घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आमचे गोलंदाज ज्या पद्धतीने एकूण धावसंख्येवर नियंत्रण ठेवत आहेत ते जबरदस्त आहे.’
दरम्यान, कर्णधार शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी संघाली चांगली सुरुवात करून दिली. गिलने अवघ्या 34 चेंडूत अर्धशतक ठोकलं. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी 114 धावांची भागीदारी केली. शुबमन गिलची आयपीएलमधील पाचवी शतकी भागीदारी आहे.यापूर्वी वृद्धिमान साहाबरोबर दोनदा, तर साई सुदर्शनसोबत तिसऱ्यांदा शतकी भागीदारी केली आहे. आयपीएल 2024 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध अहमदाबादमध्ये साई सुदर्शन आणि शुबमन गिलने 210 धावांची भागीदारी केली होती.
