प्रत्येक सामन्यात धावा करण्यासाठी 23.75 कोटी मिळाले नाहीत, तर..! वेंकटेश अय्यरने स्पष्टच सांगितलं की…

कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा 80 धावांनी धुव्वा उडवला. या पराभवामुळे सनरायझर्स हैदराबादच्या नेट रनरेटचं फार नुकसान झालं आहे. या सामन्यात केकेआर कठीण प्रसंगात असताना वेंकटेश अय्यरने टीमला वाचवलं. तसेच 200 धावांपर्यंत मजल मारण्यात मदत केली. या खेळीनंतर वेंकटेश अय्यरने आपलं मत मांडलं आहे.

प्रत्येक सामन्यात धावा करण्यासाठी 23.75 कोटी मिळाले नाहीत, तर..! वेंकटेश अय्यरने स्पष्टच सांगितलं की...
वेंकटेश अय्यर
Image Credit source: IPL
| Updated on: Apr 04, 2025 | 3:01 PM

कोलकाता नाईट रायडर्सच्या उपकर्णधारपदाची धुरा वेंकटेश अय्यरच्या खांद्यावर आहे. फ्रेंचायझीने त्याला रिलीज केलं आणि 23.75 कोटी रुपयांची बोली लावत पुन्हा एकदा टीममध्ये घेतलं. यासाठी कोलकाता नाईट रायडर्सने आरटीएम कार्ड वापरून रिटेन केलं होतं. त्यामुळे वेंकटेश अय्यर किती महत्त्वाचा खेळाडू आहे याचा अंदाज येतो. पण असं सर्व असताना वेंकटेश अय्यरने एक गोष्ट स्पष्ट केली की, 23.75 कोटी रुपयांचा प्राइस टॅग म्हणजे प्रत्येक सामन्यात मोठी धावसंख्या करणे असा होत नाही. संघाच्या विजयात योग्यवेळी योगदान देण्यावर लक्ष केंद्रीत आहे. धावांच्या आकडेवारीवर नाही. वेंकटेश अय्यर आयपीएल इतिहासातील तिसरा महागडा खेळाडू आहे. त्याने सुरुवातीच्या दोन सामन्यात काही खास केलं नाही. फक्त 9 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याला मिळालेल्या रकमेवरून सोशल मीडियावर ट्रोल केलं जात होतं. पण सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने 29 चेंडूत 60 धावांची खेळी केली.

वेंकटेश अय्यरने सांगितलं की, ‘दबाव थोडा आहे. पण तुम्ही लोकं (मीडिया) खूप काही सांगता. पण सर्वात महागडा खेळाडू असण्याचं कारण असं नाही की, प्रत्येक सामन्यात धावा करायला हव्यात. हे टीमला कोणत्या परिस्थितीत सामना जिंकून देतो आणि कसा प्रभाव टाकतो याबाबत आहे. दबाव पैसे आणि धावांचा नाही. तर टीमच्या विजयाचा आहे.’

आता तुझ्यावरील दबाव कमी झाला आहे का असे विचारले असता वेंकटेश म्हणाला ‘तुम्ही मला सांगा?’ दबाव तेव्हा संपेल जेव्हा… मी नेहमीच म्हणतो, एकदा आयपीएल सुरू झाले की तुम्हाला 20 लाख की 20 कोटी मिळतात, हे महत्त्वाचे नाही. मी एक संघ खेळाडू आहे आणि माझे ध्येय संघाच्या विजयात योगदान देणे आहे. बऱ्याचदा अशा अवघड परिस्थिती उद्भवतात जिथे माझे काम काही षटके खेळून संघाला स्थिरता प्रदान करणे असते. जरी मी असे करून धावा करू शकलो नसलो तरी मी संघासाठी एक काम केलेलं असते.’

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सची मधली फळी निष्फळ ठरली होती. त्यावर वेंकटेश अय्यरने सांगितलं की, ‘आक्रमकता म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकार मारणे असे नाही. हे सर्व योग्य हेतू आणि खेळपट्टी समजून घेण्याबद्दल आहे. आम्हाला असा संघ व्हायचं नाही जो कधी 250 धावा करतो तर कधी 70 धावांवर सर्वबाद होतो. आम्हाला खेळपट्टी लवकर समजून घ्यायची आहे आणि बरोबरीच्या स्कोअरपेक्षा 20 धावा पुढे राहायचे आहेत.’