Bengaluru Stampede : चेंगराचेंगरीत 11 जणांचं मृत्यू प्रकरण, आरसीबीची कर्नाटक उच्च न्यायालयात धाव

Bengaluru stampede : एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात आरसीबी आणि डीएनए कंपनीने न्यायालयात धाव घेतली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता.

Bengaluru Stampede : चेंगराचेंगरीत 11 जणांचं मृत्यू प्रकरण, आरसीबीची कर्नाटक उच्च न्यायालयात धाव
Bengaluru Stampede
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Jun 09, 2025 | 5:04 PM

बंगळुरुत 4 जून रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु फ्रँचायजीने कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आरसीबीने रजत पाटीदार याच्या नेतृत्वात अंतिम सामन्यात पंजाब किंग्सवर मात करत आयपीएल 2025 ट्रॉफी जिंकली होती. आरसीबीच्या या विजयाचा जल्लोष करण्यासाठी 4 जून रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात लाखोंच्या संख्येत चाहते आल्याने चेंगराचेंगरी झाली. त्यात 11 जणांचा दुर्देवी अंत झाला. तर 50 पेक्षा जास्त जण जखमी झाले. पोलिसांनी या प्रकरणात आरसीबी, कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन आणि डीएनए मॅनेजमेंट कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला होता. जल्लोषाच्या कार्यक्रमात हलगर्जीपणा केल्याचं या एफआयआरमध्ये म्हटलं होतं. आता याविरोधात आरसीएसल अर्थात रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स लिमिटेडने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

“आम्हाला यात चुकीच्या पद्धतीने अडकवलंय”

“आम्हाला यात चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आल्याचं आरसीएसलचं म्हणणं आहे. आम्ही विजयी जल्लोषाच्या कार्यक्रमासाठी एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मोफत एन्ट्री ठेवली होती. मात्र त्यासाठी नोंदणीची अट ठेवली होती. आम्हाला यात अडकवलं जात आहे”, असं आरसीएसलचं म्हणणं आहे.

तर दुसऱ्या बाजूला चिन्नास्वामी स्टेडियममधील कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क कंपनीनेही त्यांच्याविरोधातील गुन्हा मागे घेण्यात यावा, यासाठी न्यायलयाचं दार ठोठावलं आहे. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर पर्याप्त पोलीस बंदोबस्त नव्हता. त्यामुळे हा सर्व प्रकार घडला, असं डीएनए एंटरटेनमेंट कंपनीचं म्हणणं आहे.

सीआयडीकडून तपास सुरु

चेंगराचेंगरी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग केला. आता सीआयडीकडून या प्रकरणाची तपासणी केली जात आहे. चेंगराचेंगरी प्रकरणात आरसीबी मार्केटींग टीम हेड निखिल सोसाळे न्यायालयीन कोठडीत आहेत. तर दुसऱ्या बाजूला उच्च न्यायालयाने पोलिसांना केएससीए अधिकाऱ्यांविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यापासून रोखले आहे. केएससीएच्या कोषाध्यक्ष आणि सचिवांनी या प्रकरणात राजीनामा दिला आहे.

एफआयआरमध्ये नक्की काय?

कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन, आरसीबी आणि डीएनए कंपनीने परवानगी नाकारल्यानंतरही कार्यक्रमांचा आयोजन केलं. तसेच आरसीबीने कोणत्याही परवानगीशिवाय 4 जून रोजी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट आणि वेबसाईटवरुन चाहत्यांना विजयी जल्लोषासाठी आमंत्रित केलं, असा उल्लेख पोलिसांनी एफआयआरमध्ये केला आहे.

आम्ही चेंगराचेंगरीची बातमी माध्यमांमधून समोर आल्यानंतर वरिष्ठांना कळवलं. तसेच पोलीस बंदोबस्त वाढवण्याची विनंती केली. ही परिस्थिती आरसीबीने केलेल्या त्या सोशल मीडिया पोस्टमुळे बिकट झाल्याचं पोलिसांनी म्हटलं. दरम्यान आता या प्रकरणात न्यायालय काय निर्णय देतं? याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.