वैभव सूर्यवंशी 27 कोटींच्या खेळाडूवर पडला भारी, एका सामन्यासाठी मिळतात इतके पैसे

आयपीएल 2025 स्पर्धेतील 47व्या सामन्यानंतर सर्वत्र फक्त एकाच नावाची चर्चा आहे ती म्हणजे वैभव सूर्यवंशी.. वैभव सूर्यवंशीने वयाच्या 14व्या वर्षी आयपीएलमध्ये शतक ठोकून इतिहास रचला आहे. या खेळीनंतर 27 कोटी घेणार्‍या खेळाडूवर कसा भारी पडला ते जाणून घ्या.

वैभव सूर्यवंशी 27 कोटींच्या खेळाडूवर पडला भारी, एका सामन्यासाठी मिळतात इतके पैसे
वैभव सूर्यवंशी
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 29, 2025 | 3:29 PM

आयपीएल 2025 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळीनंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. वयाच्या 14 व्या वर्षी केलेली कामगिरी खरंच कौतुकास्पद आहे. कारण पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात 35 चेंडूत शतक ठोकत इतिहास रचला आहे. त्याने या खेळीत 11 उत्तुंग षटकार मारले. 14 व्या वर्षी 130 ते 140 किमी वेगाने येणाऱ्या चेंडूंचा सामना करत ते सीमेपार पाठवणं खरंच कौतुकास्पद आहे. राजस्थान रॉयल्सने वैभव सूर्यवंशीसाठी मेगा लिलावात 1.10 कोटी मोजले आहे. आयपीएलमधील संपूर्ण पर्वासाठी त्याला ही रक्कम दिली गेली आहे. पण त्याला एका सामन्यासाठी किती रुपये मिळतात? तसेच आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू असलेल्या ऋषभ पंतवर कसा भारी पडला ते जाणून घेऊयात..

आयपीएल 2025 स्पर्धेतील साखळी फेरीत प्रत्येक संघ 14 सामने खेळणार आहे. राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशीला 1.10 कोटी रुपये मिळाले आहेत. मॅच फी वगैरे पकडली तर वैभव सूर्यवंशीची रक्कम 15.35 लाख रुपये होते. यातून त्याच्या सामना फी ही 7.50 लाख रुपये आहे. मग असं गणित असताना वैभव सूर्यवंशी 27 कोटींच्या ऋषभ पंतवर भारी कसा पडला? त्याचं उत्तर असं की, लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणाऱ्या ऋषभ पंतने 9 डावात जितक्या धावा केल्यात. त्यापेक्षा अधिक धावा वैभव सूर्यवंशीने फक्त 3 डावात केल्या आहेत. अजून काही साखळी फेरीचे सामने शिल्लक आहेत. त्यामुळे यात आणखी भर पडू शकते.

ऋषभ पंतने आतापर्यंत खेळलेल्या दहापैकी 9 डावात फक्त 110 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 12.22 ची आहे. तर स्ट्राईक रेट हा 98.21 चा आहे. ऋषभ पंतने 9 डावात फक्त 5 षटकार आणि 9 चौकार मारले आहेत. तसेच एकच अर्धशतक ठोकलं आहे. दुसरीकडे, वैभव सूर्यवंशीने तीन डावातच शतकी खेळी केली आहे. 35 चेंडूत शतक ठोकलं. त्याचं आयपीएल करिअरमधील पहीलं शतक आहे. त्याने तीन सामन्यांच्या तीन डावात 50.33 च्या सरासरीने 151 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट 215.71 चा आहे. यात 16 षटकार आणि 9 चौकार आहेत.