
आयपीएलच्या आगामी 19 व्या मोसमातील (IPL 2026) पहिल्या टप्प्याचं 11 मार्च रोजी वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. त्यानुसार 28 मार्चपासून या क्रिकेट विश्वातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीगचा थरार रंगणार आहे. पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर झाल्यानतंर एकूण 10 संघ तयारीला लागले आहेत. काही संघांचा जोरदार सराव सुरु आहे. काही संघांकडून नव्या जर्सीचं अनावरण करण्यात आलंय. अशा सर्व घडामोडी सुरु आहेत. कोचिंग स्टाफमध्येही अदलाबदल पाहायला मिळत आहेत. एकूणच नेहमीप्रमाणे प्रत्येक मोसमाआधी जे होतं ते यंदाही पाहायला मिळत आहे. मात्र एका दिग्गज खेळाडूने 19 व्या मोसमाआधी टीमची साथ सोडल्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
आयपीएलच्या इतिहासात एकदाही ट्रॉफी न जिंकलेल्या दिल्ली कॅपिट्ल्सला मोठा झटका लागला आहे. इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसन याने आपण आगामी हंगामात दिल्ली कॅपिट्ल्ससोबत नसणार हे जाहीर केलं आहे. केविनने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉमवरुन चक्क हिंदीत पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. पीटरसन गेल्या मोसमात दिल्ली कॅपिट्ल्सचा मेन्टॉर होता. पीटरसनचं ते मेन्टॉर म्हणून पहिलंच वर्ष होतं.
जितका वेळ या कामासाठी अपेक्षित आहे तितका वेळ मी देऊ शकत नाही. त्यामुळे पीटरसन यंदा दिल्लीच्या डगआऊटमध्ये दिसणार नाही. मात्र त्यानंतरही पीटरसन आयपीएलचा भाग असणार आहे. पीटरसन यंदा कॉमेंट्रीच्या माध्यमातून क्रिकेट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
केविन पीटरसन याची एक्स पोस्ट
🚨 समाचार 🚨
मैं आईपीएल के इस सीजन में दिल्ली कैपिटल्स के लिए मेंटर नहीं बन सकता।
मैं उस समय के लिए प्रतिबद्ध नहीं हो सकता, जो काम की आवश्यकता है।
सभी खिलाड़ियों को इस सीजन के लिए शुभकामनाएं! ❤️
हालांकि मैं आपको कॉम बॉक्स में वापस देखूंगा! आईपीएल दुनिया की सबसे अच्छी लीग है…
— Kevin Pietersen🦏 (@KP24) March 14, 2026
“मी आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दिल्लीचा मेंटॉरपदाची जबाबदारी सांभाळू शकत नाही. सर्व खेळाडूंना या मोसमासाठी शुभेच्छा”, अशा शब्दात पीटरसन याने आपण यंदा दिल्लीसाठी उपलब्ध नसल्याचं सांगितलं. तसेच खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
“तुम्ही मला पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहू शकता. आयपीएल ही जगातील सर्वोत्तम लीग आहे. तुम्हा सर्वांना लवकरच भेटण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे”, असं म्हणत पीटरसन याने या मोसमासाठी उत्सूकता बोलून दाखवली आहे.
दरम्यान दिल्ली या 19 व्या मोसमातील आपला पहिला सामना 1 एप्रिलला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर दिल्ली 4 एप्रिलला मुंबई विरुद्ध 2 हात करेल. तर 8 एप्रिलला गुजरात टायंटन्स विरुद्ध सामना होणार आहे. तर दिल्ली 11 एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मैदानात उतरणार आहे.