IPL 2026 PLayoff: केकेआर आणि पंजाबला त्या सामन्याचा पश्चाताप, निकालानंतर दोघांचं झालं नुकसान
आयपीएल 2026 स्पर्धेतील प्लेऑफसाठी चार संघ ठरले आहे. राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला पराभवाची धूळ चारली आणि चौथा संघ ठरला. त्यामुळे केकेआर आणि पंजाब किंग्सचा स्पर्धेतून पत्ता कट झाला आहे. असं असताना पंजाब आणि केकेआरला एका सामन्याचं दु:ख असणार आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेत आता प्लेऑफमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे चार संघ ठरले आहे. आयपीएलच्या 69व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला 30 धावांनी पराभूत केलं आणि प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या आशा संपुष्टात आल्या. त्यामुळे या दोन्ही संघाना साखळी फेरीतील एका सामन्याचा पश्चाताप झाला आहे. त्याला कारणही तसंच आहे. कारण या दोन्ही संघांमधील एक सामना पावसामुळे रद्द झाला आणि त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. कोलकात्यापेक्षा पंजाब किंग्सचं या सामन्यामुळे सर्वाधिक नुकसान झालं असंच म्हणावं लागेल. कारण या स्पर्धेच्या सुरूवातीला पंजाब किंग्सने चांगली कामगिरी केली होती. तसेच प्लेऑफमध्ये जागा मिळवेल अशी स्थिती होती. पण सलग सहा पराभवामुळे प्लेऑफचं स्वप्न भंगलं. त्यात त्या सामन्याची भर पडली.
आयपीएल 2026 स्पर्धेतील 12वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होणार होता. या सामन्यात नाणेफेकीचा कौल कोलकाता नाईट रायडर्सने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पंजाब किंग्सने या सामन्यावर पावरप्लेमध्ये पकड मिळवली होती. 3.4 षटकात केकेआरचे 2 महत्त्वाचे खेळाडू 25 धावांवर तंबूत पाठवले होते. त्यामुळे हा सामना काही अंशी पंजाबच्या बाजूने झुकलेला होता, असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. पण हा सामना रद्द झाल्याने प्रत्येकी 1 गुण मिळाला. त्याचा परिणाम गुणतालिकेत झाला. पंजाब किंग्सचे 14 सामन्यात 7 विजय आणि 6 पराभवासह 15 गुण झाले. तर नेट रनरेट हा +0.309 राहिला.
राजस्थान रॉयल्सने 8 सामन्यात विजय मिळवून 16 गुणांची कमाई केली. तसेच नेट रनरेट हा पंजाबपेक्षा कमी आहे. राजस्थानचा नेट रनरेट हा +0.189 आहे. पण एका गुणाने गणित चुकलं. दुसरीकडे, केकेआरचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सुरू आहे. त्यानाी हा सामना जिंकला तर 15 गुण होतील. त्यामुळे त्यांचंही प्लेऑफचं स्वप्न सामना संपण्यापूर्वीच भंगलं. त्या सामन्याचा निकाल लागला असता तर दोन्ही संघापैकी एकाचे 16 गुण झाले असते आणि नेट रनरेटच्या आधारावर प्लेऑफमध्ये जागा मिळाली असती.