लखनौ सुपर जायंट्सचा रणनिती चुकली! ऋषभ पंतकडून अपेक्षाभंग, चार सामन्यात घडलं असं काही…

आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सने तीन पैकी 2 सामन्यात निसटता विजय मिळवला आहे. पण या स्पर्धेत ऋषभ पंतची कामगिरी मात्र हवी तशी झालेली नाही. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सची रणनिती चुकली की काय? असा प्रश्न पडत आहे.

लखनौ सुपर जायंट्सचा रणनिती चुकली! ऋषभ पंतकडून अपेक्षाभंग, चार सामन्यात घडलं असं काही...
लखनौ सुपर जायंट्सचा रणनिती चुकली! ऋषभ पंतकडून अपेक्षाभंग, चार सामन्यात घडलं असं काही...
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 12, 2026 | 5:37 PM

आयपीएल स्पर्धेत सर्वात महागडा खेळाडू म्हणून ऋषभ पंतची ख्याती आहे. आतापर्यंतच्या इतिहासात इतका महाग खेळाडू कोणीच नाही. पण महागड्या खेळाडूची कामगिरी मागच्या पर्वापासून काही चांगली नाही. प्रत्येक वेळी त्याच्याकडून अपेक्षा केली जाते, मात्र पदरी निराशा पडताना दिसत आहे. अशीच काहीशी स्थिती यंदाच्या पर्वातही दिसत आहे. आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत 4 सामने खेळला आहे. पण यापैकी फक्त एक सामना सोडला तर इतर सामन्यात निराशाजनक कामगिरी केली आहे. या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात ऋषभ पंतने अर्धशतकी खेळी करून संघाला विजयी केलं. पण त्यानंतर पुन्हा एकदा धावांसाठी संघर्ष करताना दिसला. गुजरात टायटन्सविरुद्धच्या चौथ्या सामन्यातही त्याची स्थिती तशीच होती. सुरूवात आक्रमक केली पण स्वस्तात बाद झाला. त्यामुळे त्याचा फॉर्म हा लखनौ सुपर जायंट्ससाठी चिंतेचा विषय ठरला आहे.

फलंदाजीचा क्रम बदलला पण…

आयपीएल 2026 स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात ऋषभ पंत सलामीला उतरला होता. तेव्हा त्याने 9 चेंडूत 7 धावा केल्या आणि बाद झाला. त्यामुळे पंत ओपनिंगला येईल असं वाटलं. पण दुसऱ्या सामन्यात क्रम बदलला. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर उतरला आणि नाबाद 68 धावा केल्या. कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंत पुन्हा एकदा तिसऱ्या स्थानावर उतरला आणि 9 चेंडूत 10 धावा केल्या. आता पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला आणि 11 चेंडूत 2 चौकार आणि 1 षटकार मारत 18 धावांवर बाद झाला. मागच्या पर्वात ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. मात्र या पर्वात क्रम बदलून काही फरक पडलेला नाही.

ऋषभ पंतने आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यात 103 धावा केल्या आहेत. यात नाबाद 68 ही सर्वात्तम खेळी ठरली. त्याने 34.33 च्या एव्हरेजने धावा केल्या. तर स्ट्राईक रेट हा 130.37 आहे. त्याचा स्ट्राईक रेट आक्रमक शैली जराही शोभत नाही. दरम्यान, लखनौ सुपर जायंट्सचा डाव 20 षटकात 8 गडी गमवून 164 धावांवर आटोपला. तसं पाहिलं तर हा स्कोअर खूपच कमी आहे. त्यामुळे या स्पर्धेतील दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागू शकतं. पण ही खेळपट्टी गोलंदाजांसाठी पूरक आहे. त्यामुळे काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us