IRE vs IND : टीम इंडिया पहिल्या सामन्यासाठी सज्ज, श्रेयसकडे नेतृत्व, वैभवचं पदार्पण होणार?
Ireland vs India 1st T20i Live and Digital Streaming : टीम इंडियाची युवा ब्रिगेड आयर्लंड दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. वैभव सूर्यवंशीचं आंतरराष्ट्रीय पदार्पण होणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे.

टीम इंडियाच्या आयर्लंड दौऱ्याची शुक्रवार 26 जूनपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध 2 सामन्यांची टी 20I मालिका खेळणार आहे. या मालिकेतून टीम इंडियाच्या नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यर या मालिकेतून टी 20I कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे. श्रेयस पहिल्या सामन्यातून कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव याची जागा घेणार आहे. तर आयर्लंडनेही कर्णधार बदलला आहे. नियमित कर्णधार पॉल स्ट्रर्लिंग याला दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर व्हावं लागलंय. त्यामुळे पॉलच्या जागी लॉरेन टकर याच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा असणार आहे. त्यामुळे श्रेयस आणि लॉरेन या दोघांपैकी कोणता खेळाडू हा कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात आपल्या संघाला विजयी करण्यात यशस्वी ठरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
वैभव सूर्यवंशीचं पदार्पण होणार?
वैभव सूर्यवंशी याने आयपीएल स्पर्धेत आपल्या विस्फोटक खेळीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवलं. आता वैभवला पहिल्या सामन्यातून पदार्पणाची संधी मिळणार का? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे. वैभवला संधी मिळाल्यास तो भारताकडून सर्वात कमी वयात पदार्पण करण्याबाबत सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढेल. उभयसंघातील सामना बेलफास्टमधील सिव्हील सर्व्हीस क्रिकेट क्लबच्या मैदानात होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सुरुवात होईल. तर 5 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल. तर सोनी लिव्ह एपद्वारे मोबाईल आणि लॅपटॉपवर लाईव्ह मॅच पाहता येईल.
हेड टु हेड रेकॉर्ड
टीम इंडिया टी 20I क्रिकेटमध्ये आयर्लंड विरुद्ध वरचढ असल्याचं आकड्यांतून स्पष्ट होतं. उभयसंघात आतापर्यंत टी 20I क्रिकेटच्या इतिहासात एकूण 8 सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने या आठही सामन्यात आयर्लंडवर मात केली आहे. उभयसंघातील शेवटचा सामना हा आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत झाला होता. तेव्हा भारताने आयर्लंडवर 8 विकेट्सने विजय मिळवला होता.
सूर्यांश शेडगेला संधी, पदार्पण होणार?
दरम्यान ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी याला दुखापतीमुळे आयर्लंड विरूद्धच्या मालिकेतून बाहेर व्हावं लागलं. त्यामुळे त्याच्या जागी मुंबईकर युवा फलंदाज सूर्यांश शेडगे याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सूर्यांशला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.