
डब्लिन | टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याने रविवारी 20 ऑगस्टला आयर्लंड विरुद्ध दुसऱ्या टी 20 सामन्यात फक्त एकच विकेट घेतली. मात्र अर्शदीपने एक विकेट घेत इतिहास रचला. अर्शदीपने आयर्लंडच्या एंड्रयू बालबिर्नी याला 72 धावांवर आऊट केलं. अर्शदीपने यासह अनोखं अर्धशतक पूर्ण केलं. अर्शदीने टी 20 आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 50 विकेट्स पूर्ण केल्या. अर्शदीप टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान 50 विकेट्स घेणारा पहिलाच भारतीय ठरला. अर्शदीपने कॅप्टन जसप्रीत बुमराह याचा रेकॉर्ड ब्रेक केला.
अर्शदीपने टी 20 क्रिकेटमधील 33 व्या डावात 50 विकेट्सचा टप्पा पर्ण केला. तर जसप्रीत बुमराह याने 41 डावांमध्ये 50 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.
दरम्यान टीम इंडियाने दुसरा सामना 33 धावांनी जिंकला. आयर्लंडने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाकडून ऋतुराज गायकवाड याने सर्वाधिक 58 रन्सची अर्धशतकी खेळी केली. संजू सॅमसन याने 40 धावांचं योगदान दिलं. तर शेवटी रिंकू सिंह याने 38 आणि शिवम दुबे याने 22 धावा ठोकत फिनिशिंग टच दिला. टीम इंडियाने आयर्लंडला 186 रन्सचं टार्गेट दिलं.
आयर्लंडने 186 रन्सचा पाठलाग करताना चांगली झुंज दिली. मात्र त्यांना काही जिंकता आलं नाही. आयर्लंडने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 152 धावा केल्या. टीम इंडियाने अशा प्रकारे 33 धावांनी सामना जिंकला आणि मालिका 2-0 फरकाने खिशात घातली. मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना हा 23 ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे. आता हा सामना जिंकून टीम इंडियाकडे आयर्लंडला क्लिन स्वीप देण्याची संधी आहे. तर आयर्लंड टीम इंडियाला पराभूत करण्याच्या प्रयत्नाने मैदानात उतरेल.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | जसप्रीत बुमराह (कॅप्टन) ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग आणि रवी बिश्नोई.
आयर्लंड प्लेईंग इलेव्हन | पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, बॅरी मॅककार्थी, क्रेग यंग, जोशुआ लिटल आणि बेंजामिन व्हाइट.