ENG vs IND : सिराज-आकाश दीपचा धमाका, इंग्लंडचं 407 वर पॅकअप, भारताला 180 धावांची मोठी आघाडी

England vs India 2nd Test Day 3 : मोहम्मद सिराज आणि आकाश दीप या जोडीने शेवटच्या काही मिनिटांमध्ये जोरदार कमबॅक केलं आणि 20 धावांच्या मोबदल्यात इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत पाठवला. त्यामुळे भारताला 180 धावांची मोठी आघाडी घेण्यात यश आलं.

ENG vs IND : सिराज-आकाश दीपचा धमाका, इंग्लंडचं 407 वर पॅकअप, भारताला 180 धावांची मोठी आघाडी
Mohammed Siraj and Akash Deep Team India
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Jul 04, 2025 | 10:45 PM

मोहम्मद सिराज आणि आकाश दीप भारताच्या या वेगवान गोलंदाजांनी जोरदार कमॅबक करत इंग्लंडला दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात 407 रन्सवर रोखण्यात यश मिळवलं आहे. भारताने कर्णधार शुबमन गिल याच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर 569 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ या जोडीने सहाव्या विकेटसाठी 369 चेंडूंमध्ये 303 धावांची भागीदारी केली. या दोघांनी दीडशतकी खेळी केली. त्यामुळे इंग्लंडला 400 पार पोहचता आलं. हॅरी आणि जेमीचा अपवाद वगळता इंग्लंडच्या इतर फलंदाजांनी सिराज आणि आकाशसमोर गुडघे टेकले. भारताने शेवटच्या 5 विकेट्स या 20 धावांच्या मोबदल्यात घेतल्या आणि इंग्लंडला गुंडाळलं. त्यामुळे भारताला 180 धावांची मोठी आघाडी मिळाली आहे. आता भारतीय संघाने दुसऱ्या डावात इंग्लंडसमोर डोंगराएवढं आव्हान ठेवावं, अशी आशा भारतीय समर्थकांना असणार आहे.

2 दीडशतकं आणि 6 भोपळे

इंग्लंडसाठी जेमी स्मिथ याने सर्वाधिक धावांची खेळी केली. जेमीने नाबाद 184 धावा केल्या. जेमीने या खेळीत 21 चौकार आणि 4 षटकार लगावले. तर हॅरी ब्रूक याने 234 चेंडूत 17 चौकार आणि 1 षटकारसह 158 धावा जोडल्या. जो रुट याने 22 तर झॅक क्रॉली याने 19 धाला केल्या. तर तब्बल 6 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. बेन डकेट, ओली पोप, बेन स्टोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग आणि शोएब बशीर या 6 फलंदाज आले तसेच गेले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकाच डावात 6 फलंदाज शून्यावर बाद होण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

इंग्लंडची बॅटिंग

भारताचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी 569 धावांवर आटोपला. त्यानंतर आकाश दीप याने इंग्लंडला त्यांच्या डावातील तिसऱ्या ओव्हरमध्ये इंग्लंडला सलग 2 झटके दिले. आकाशने बेन डकेट आणि ओली पोप या दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर मोहम्मद सिराज याने इंग्लंडला तिसरा झटका देत पहिली विकेट मिळवली. सिराजने झॅक क्रॉली याला आऊट केलं. त्यानंतर जो रुट आणि हॅरी ब्रूक या नाबाद परतलेल्या जोडीने तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली.

मोहम्मद सिराज याने तिसऱ्या दिवशी भारताला अप्रतिम सुरुवात करुन दिली. सिराजने जो रुट आणि इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स या दोघांना सलग 2 चेंडूत बाद केलं. स्टोक्सची कसोटी कारकीर्दीत पहिल्याच बॉलवर आऊट होण्याची पहिलीच वेळ ठरली. त्यामुळे इंग्लंडची स्थिती 5 आऊट 87 अशी झाली. त्यामुळे इंग्लंडवर फॉलोऑची टांगती तलवार होती. मात्र हॅरी आणि जेमी स्मिथने कमाल केली. या जोडीने सहाव्या विकेटसाठी 303 धावा जोडल्या.

सिराज-आकाशची कमाल, इंग्लंड ढेर

हॅरी आणि जेमी भारताची आघाडी मोडीत काढण्याच्या दिशेने वाटचाल करत होते. ही जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरत होती. मात्र आकाश दीपने ही जोडी फोडली. आकाशने 387 धावांवर इंग्लंडला सहावा झटका दिला आणि ही जोडी फोडली. आकाशने हॅरीला आऊट केलं. टीम इंडियाने या विकेटसह कमबॅक केलं आणि इंग्लंडला 20 धावांच्या मोबदल्यात 5 झटके दिले. यासह इंग्लंडचं 407 रन्सवर पॅकअप केलं. भारसासाठी मोहम्मद सिराज याने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. तर आकाश दीप याने चौघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.