
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका 2 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्त्वात 15 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या मालिकेसाठी उपकर्णधारपदाची धुरा रवींद्र जडेजाच्या खांद्यावर देण्यात आली आहे. तर देवदत्त पडिक्कल आणि एन जगदीशन टीम यांना संघात स्थान मिळालं आहे. पण या संघातून इंग्लंड दौऱ्यात असलेल्या करूण नायरला डावललं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. इंग्लंड दौऱ्यात करूण नायर काही खास करू शकला नाही. त्यामुळे त्याची संघातून गच्छंती होणार असा अंदाज वर्तवला जात होता. झालंही तसंच.. टीम इंडियात 8 वर्षानंतर पुनरागमन केल्यानंतर करूण नायरला इंग्लंड दौऱ्यानंतर आता डावललं गेलं आहे. आता टीम इंडियात त्याचं पुनरागमन होणं कठीण दिसत आहे. दरम्यान, टीम इंडियातून डावलल्यानंतर करूण नायरने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
करूण नायर म्हणाला की, ‘हा.. मला संघात निवड होईल असं वाटलं होतं. मला माहिती नाही काय बोलायचं. माझ्याकडे शब्द नाहीत. माझ्याकडे सांगण्यासाठी खास काही नाही. माझ्यासाठी उत्तर देणं कठीण आहे. तुम्ही निवडकर्त्यांना विचारलं पाहीजे की त्यांच्या मनात काय आहे. इंग्लंड दौऱ्यातील शेवटच्या सामन्यात जेव्हा पहिल्या डावात कोणी धावा केल्या नव्हत्या. तेव्हा मी अर्धशतक ठोकलं होतं. मला असं वाटते की मी फलंदाजीत योगदान दिलं होतं.’
दुसरीकडे, करूण नायरला डावलल्यानंतर निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी सांगितलं की, ‘प्रामाणिकपणे सांगायचं तर आम्ही करूण नायरकडून खूप जास्त अपेक्षा केल्या होत्या. त्याने चार कसोटी सामने खेळले. पण तो एकाच डावाची चर्चा करत आहे. आम्हाला वाटतं की ही वेळ पडिक्कलसाठी चांगली असेल. आम्ही सर्वांना 15 किंवा 20 कसोटी खेळण्याची संधी देऊ शकलो असतो, तर आनंद झाला असता. पण दुर्दैवाने तसे झालं नाही. ‘
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी 2 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जाईल. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे. या मालिकेतून भारताला विजयी टक्केवारी वाढवण्यास मदत होईल. अन्यथा भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित चुकू शकतं. मागच्या पर्वात न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावल्याने अंतिम फेरीत तिसऱ्यांदा धडक मारण्याचं स्वप्न भंगलं होतं.