
मुंबई: कॅरेबियाई प्रीमियर लीग स्पर्धा सुरु झाली आहे. वेस्ट इंडिजच्या (West Indies) क्रिकेटपटूंची आक्रमक फटकेबाजी या स्पर्धेत पहायला मिळतेय. एक सप्टेंबरला सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियोट्स आणि बारबाडोस रॉयल्स मध्ये सामना खेळला गेला. बारबाडोसने हा सामना जिंकला. बारबाडोससाठी ( barbados royals) या सामन्यात विजय सोपा नव्हता. पण एका फलंदाजाने हे काम सोपं केलं. या इनिंग सोबत या खेळाडूने या सीजनमधील पहिल अर्धशतकही झळकावलं.
प्रथम फलंदाजी करताना सेंट किट्सने आठ विकेट गमावून 149 धावा केल्या. बारबाडोसच्या टीमने तीन विकेट गमावून 15.1 षटकात हे लक्ष्य गाठलं. बारबाडोसच्या या विजयात काइल मायेर्सची बॅट तळपली. आतापर्यंत त्याची बॅट शांत होती. काइल मायेर्सने 11 चेंडू बाकी राखून विजय मिळवला. पावसामुळे हा सामना 17 षटकांचा करण्यात आला होता.
17 ओव्हर्स मध्ये 150 धावांचे लक्ष्य सोपे नव्हते. समोर ब्राव्हो, शेल्डन कॉटरेल, ड्वेन प्रीटोरियस आणि अकिला धनंजय सारखे गोलंदाज होते. मायेर्सने या सगळ्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने खोऱ्याने धावा वसूल केल्या. मायेर्सने 46 चेंडूत 73 धावा फटकावल्या. संघ विजयाच्या समीप पोहोचलेला असताना, मायेर्स आऊट झाला. मायेर्सची विकेट पडली, त्यावेळी संघाची धावसंख्या 145 होती. 158.69 च्या स्ट्राइक रेटने त्याने धावा केल्या. रखीम कोर्नावेलने 39 धावा केल्या. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. मायेर्स याआधी तीन सामने खेळला होता. तीन सामन्यात त्याने एकही अर्धशतक फटकावलं नव्हतं.