IPL 2026 स्पर्धेपूर्वी भारताच्या दिग्गजाने घेतली निवृत्ती, बीसीसीआयवर आरोप करताच अश्विनने कान टोचले
आयपीएल 2026 स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. असं असताना माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवारामकृष्णन यांनी समालोचनला रामराम ठोकला आहे. यावेळी त्यांनी बीसीसीआयवर गंभीर आरोप केले आहे. आरोपानंतर अश्विनने उलट प्रश्न विचारत कान टोचले.

आयपीएल 2026 स्पर्धेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेसाठी अवघ्या एका आठवड्याचा अवधी शिल्लक आहे. असं असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू असलेल्या लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी समालोचनला रामराम ठोकला आहे. त्यांनी निवृत्तीची घोषणा सोशल मीडियावर केली. त्यांनी पोस्ट करत लिहिलं की, बीसीसीआयसाठी समालोचन करण्यापासून निवृत्त घेत आहे. येथपर्यंत ठीक आहे. पण पुढे त्यांनी जे काही लिहिलं त्यामुळे क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. कारण त्यांनी बीसीसीआयवर वर्णभेदाचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी आरोप केला की, रंगाच्या आधारावर भेदभाव केला गेला. त्यामुळे नाणेफेक किंवा खेळपट्टीच्या वृत्तांकन करण्याची संधी नाकारली गेल्याचं सांगितलं.
शिवरामकृष्णन यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं की, “मी बीसीसीआय समालोचनातून निवृत्त होत आहे. 23 वर्षांत, मला कधीही सादरीकरणासाठी संधी मिळाली नाही आणि खेळपट्टी अहवाल, नाणेफेक आणि सादरीकरणे नवीन लोक हाताळतात. शास्त्री प्रशिक्षक असतानासुद्धा हेच घडत होते. तर, तुमच्या मते याचे कारण काय असू शकते?” त्यानंतर एका चाहत्याने प्रश्नावर उत्तर देताना लिहिलं की, “कदाचित तुमच्या वर्णामुळे तुम्हाला नाणेफेकीसाठी बोलावले जात नाही.” या उत्तरावर शिवरामकृष्णन यांनी, ‘अगदी बरोबर’ असं उत्तर दिलं. त्यामुळे शिवरामकृष्णन यांनी बीसीसीआयवर वर्णद्वेषाचा आरोप केल्याचं स्पष्ट होतं.
आर अश्विनने कान टोचले
शिवरामकृष्णन यांच्या निवृत्तीनंतर माजी फिरकीपटू आर अश्विन याने एक पोस्ट केली आहे. अश्विनने त्यांच्या पोस्टला उत्तर देताना लिहिलं की, “आयपीएलमधून समालोचन का सोडून देत नाहीत?” आर अश्विन आणि शिवरामकृष्णन यांच्यातील संबंध गेल्या काही वर्षात कमालीचे ताणले गेले आहेत. शिवरामकृष्णन यांनी आर. अश्विनला एक खराब गोलंदाज म्हणून संबोधलं होतं. इतकंच काय तर भारतीय खेळपट्ट्यांवर एक मूर्खसुद्धा विकेट घेऊ शकतो, अशी टीका केली होती. दुसरीकडे, 100व्या कसोटीवर चर्चा करण्यासाठी फोन केला तेव्हा अश्विनने फोन कट केले असा आरोपही केला होता.
शिवरामकृष्णन यांनी 17व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने 9 कसोटी आमि 16 वनडे सामने खेळले. त्यांनी कसोटी 26 आणि वनडे क्रिकेटमध्ये 15 विकेट काढल्या. तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर 154 विकेट आणि 5 शतकं ठोकली आहेत.