M S Dhoni Retirement : अखेर धोनीच्या रिटायरमेंटचा सस्पेन्स संपला, आगामी IPL मध्ये…चेन्नई संघानेच सांगून टाकलं
क्रिकेट चाहत्यांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवणाऱ्या महेंद्रसिंह धोनीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनीच काही महत्त्वाचे संकेत दिले आहेत.

IPL 2027 And M S Dhoni : कधीकाळी भारताचा स्टार क्रिकेटपटू म्हणून ओळख असलेल्या महेंद्रसिंह धोनीची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन जवळपास पाच वर्षे लोटली आहेत. परंतु अजूनही क्रिकेट रसिकांना महेंद्रसिंह धोनी क्रिकेट खेळताना पाहायला मिळावा, असेच वाटते. सध्या धोनी आयपीएलमध्ये चेन्नई संघाचा भाग आहे. 2026 सालच्या हंगामात धोनी संघाचा भाग होता परंतु तो एकही सामना खेळला नाही. त्यामुळेच तो 2027 सालचा आयपीएलचा हंगाम खेळणार का? असा सवाल त्याच्या चाहत्यांना पडला आहे. आता शेवटी या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे.
धोनी अजूनही चांगले क्रिकेट खेळू शकतो
क्रिकेट चाहत्यांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवणाऱ्या महेंद्रसिंह धोनीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनीच काही महत्त्वाचे संकेत दिले आहेत. धोनी अजूनही चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळू शकतो. तो येणाऱ्या आयपीएलमध्ये खेळण्याचा प्रयत्न करू शकतो. तो चेन्नई संघाचा भाग असू शकतो, असं विश्वनाथन यांनी सांगितलंय. विश्वनाथन यांच्या या विधानानंतर महेंद्रसिंह धोनी 2027 सालच्या आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतो, असा अंदाज लावला जातोय.
धोनी स्वत:चा निर्णय…
चेन्नईमध्ये माध्यमांशी संवाद साधताना विश्वनाथन यांनी धोनीच्या क्रिकेटबद्दल सविस्तर भाष्य केलं. आयपीएल 2027 मध्ये क्रिकेट खेळायचे की नाही, याचा अंतिम निर्णय धोनीच घेईल. धोनी चेन्नईत आल्यानंतर तो स्वतःचा निर्णय संघ व्यवस्थापनाला कळवतो. तो अजूनही खेळाडू आहे आणि सीएसकेकडून खेळत राहण्याची शक्यता आहे, असे पुढे विश्वनाथन म्हणाले. सोबतच त्याच्या निवृत्तीबाबत मला विचारण्याऐवजी त्यालाचा विचारायला हवे, असेही त्यांनी सांगितले.
धोनी 2027 सालच्या आयपीएलमध्ये दिसणार का?
दरम्यान, धोनी सध्या 45 वर्षांचा आहे. 2026 सालच्या आयपीएलमध्ये तो एकदाही मैदानावर उतरला नाही. तो संघाचा भाग होता परंतु तो प्रत्यक्ष क्रिकेट खेळताना दिसला नाही. त्यामुळे आता 2027 सालच्या आयपीएलमध्ये दिसणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.