
मुंबई इंडियन्सला अखेर आयपीएलच्या 17 व्या मोसमात सलग 3 पराभवानंतर सूर गवसला. मुंबईने 7 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला. रोमरियो शेफर्ड याने 20 व्या ओव्हरमध्ये ठोकलेल्या 32 धावांच्या जोरावर मुंबईने दिल्लीसमोर विजयासाठी 235 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दिल्लीला या आव्हानाचा पाठलाग करताना 8 विकेट्स गमावून 205 धावाच करता आल्या. मुंबईने अशाप्रकारे कॅप्टन हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात पहिलावहिला विजय मिळवला. हार्दिक पंड्या याने विजयानंतर प्रतिक्रिया देताना काय म्हणाला? त्याने विजयाचं श्रेय कुणाला दिलं? हे जाणून घेऊयात.
“आम्हाला हा विजय मिळवण्यासाठी फार मेहनत करावी लागली. आम्ही सकारात्मक हेतूने स्वत:वर विश्वास ठेवला. आम्ही येणाऱ्या सामन्यांमध्ये बदल करु शकतो, मात्र सध्या कॉम्बिनेशन चांगलं आहे. ड्रेसिंग रुममधील वातावरण चांगलं आहे. सर्व एक दुसऱ्याला सहकार्य करत आहेत. पुन्हा ट्रॅकवर येण्यासाठी एक विजय आवश्यक असल्याचं पूर्ण टीमचं मत होतं. आज सुरुवात शानदार होती. 6 ओव्हरमध्ये 70 धावा करणं शानदार आहे”, असं हार्दिकने म्हटलं.
रोमरियो शेफर्ड याने केलेल्या खेळीचं हार्दिकने कौतुक केलं. “रोमरियोने शानदार हिटींग केली. त्याने आम्हाला जिंकवलं. दिल्ली विरुद्धच्या विजयात रोमरियो याने निर्णायक भूमिका बजावली. मला रोमरियोची बॅटिंग आवडते. तो कायम हसत असतो”, असं हार्दिकने रोमरियो बद्दल म्हटलं.
हार्दिकने दिल्ली विरुद्ध बॉलिंग केली नाही. हार्दिकला याबाबत पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये प्रश्न विचारण्यात आला. यावर हार्दिक उत्तर देताना म्हणाला की, “मी ठीक आहे. मी योग्य वेळेस बॉलिंग करेन. आज आम्ही सर्वकाही सावरलं आहे. त्यामुळे मी बॉलिंगपासून दूर होतो.”
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, पीयूष चावला, जेराल्ड कोएत्झी आणि जसप्रीत बुमराह.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, झाये रिचर्डसन, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा आणि खलील अहमद.