Municipal Elections : अजित दादा- शरद पवारांचं ठरलं, एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, जागावाटपाचा आकडा काय?
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असून अजित पवारांनी १२५ तर शरद पवारांच्या गटाने ४० जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (२८ डिसेंबर २०२५) मोठी घोषणा केली आहे. अजित पवार आणि शरद पवार गट पुण्यात एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. परिवार पुन्हा एकत्र येत आहे, असे भावनिक विधान करत त्यांनी या युतीवर शिक्कामोर्तब केले.
पुण्यात जागावाटपाचे सूत्र काय?
गेल्या काही काळापासून एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले अजित पवार आणि शरद पवार यांचे गट आता आगामी निवडणुकांसाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. या दोन्ही गटांमध्ये जागावाटप ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट १२५ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ४० जागांवर निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात आज दुपारी एक महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यामध्ये युतीची अधिकृत घोषणा आणि पुढील रणनीती स्पष्ट केली जाणार आहे.
पिंपरी-चिंचवडसाठी अधिकृत घोषणा
तर पिंपरी-चिंचवडसाठी जागावाटपाची अंतिम यादी येत्या दोन दिवसांत जाहीर केली जाणार आहे. आता तळवडे येथील निवडणूक प्रचार सभेत अजित पवारांनी भाष्य केले. पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी काही वेळा कठोर पण आवश्यक निर्णय घ्यावे लागतात, असेही अजित पवारांनी नमूद केले.
सुरुवातीला अजित पवार यांनी सर्व उमेदवारांनी घड्याळ चिन्हावर लढावे असा आग्रह धरला होता, ज्याला शरद पवार गटाने विरोध केला होता. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार अजित पवार गट घड्याळ चिन्हावर लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर शरद पवार गट तुतारी चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे बोललं जात आहे. अशा प्रकारे दोन्ही पक्ष आपापल्या चिन्हासह पण युतीमध्ये निवडणूक लढवतील.
राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार?
यावेळी अजित पवारांनी १९९२ ते २०१७ या काळातील राष्ट्रवादीच्या कामाचा उल्लेख करत हिंजवडी आयटी पार्कचे श्रेय शरद पवारांना दिले. त्याचवेळी त्यांनी सध्याच्या सत्तेतील भ्रष्टाचारावर आणि विरोधकांकडून उमेदवारांना मिळणाऱ्या धमक्यांवर कडक शब्दांत टीका केली होती. दरम्यान ही युती केवळ स्थानिक पातळीवर आहे की याचे पडसाद राजकारणावर उमटणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
