
अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने चमकदार कामगिरी केली. त्याने या मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याचा मान मिळवला. त्याने एकूण 23 विकेट घेतल्या. त्याच्या कामगिरीचं आता सर्वत्र कौतुक होत आहे. पण पाकिस्तानमध्ये एका लाईव्ह कार्यक्रमात त्याच्यावरून राडा झाल्याचं पाहायला मिळालं. दोन माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी त्याच्यावरून वादाला पेटले. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज तन्वीर अहमद पाकिस्तानसाठी 8 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. पण त्याच्या दृष्टीने मोहम्मद सिराज हा कसोटीचा गोलंदाज नाही. यावरूनच लाईव्ह सामन्यात माजी क्रिकेटपटू आसिफ खानसोबत त्याचा वाद झाला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाकिस्तानच्या पीटीव्ही स्पोर्ट्सवर ओव्हल कसोटी सामन्याचं विश्लेषण सुरु होतं. या कार्यक्रमात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू तन्वीर अहमदने सांगितलं की, ओव्हल कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाज एकाच ठिकाणी गोलंदाजी करत होते. सिराजने चांगली गोलंदाजी केली. या कार्यक्रमाचं अँकरिंग डोमेस्टिक क्रिकेट खेळणारा आसिफ खान करत होता. त्याने तन्वीरला विचारलं की, तू तर सिराजला कसोटी बॉलर मानत नाही. त्यावर तन्वीरने सांगितलं की, सिराज त्या लेव्हलचा गोलंदाज नाही. यावर आसिफने विचारलं की, तुझी काय लेव्हल आहे?
असं विचारताच तन्वीर अहमद भडकला आणि सांगितलं की माझं स्टँडर्ड पाकिस्तान आहे. मी पाकिस्तानसाठी क्रिकेट खेळलो आहे. यानंतर माजी क्रिकेटपूट तन्वीर आसिफला विचारलं की, तुझी काय लेव्हल आहे? तेव्हा आसिफने सांगितलं की ते सोडून दे. मला 20-22 वर्षे पत्रकारिता करून झाले. यावर तन्वीरने सांगितलं की, माझं क्रिकेटसोबत इतक्याच वर्षाचं नात आहे. यानंतर खूपच वादावादी झाली. या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तन्वीर अहमदने यापूर्वी देखील भारताविरुद्ध गरळ ओकली आहे.
टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर तन्वीर अहमदने असंच वादग्रस्त विधान केलं होतं. त्याने युट्यूब चॅनेलवर सांगितलं होतं की, भारताने ही ट्रॉफी कचऱ्याच्या पेटीत फेकली पाहीजे. कारण त्याचा काही फायदा नाही. त्याने आयसीसीचे चेअरमन जय शाह यांच्यावर खेळपट्टी भारताच्या बाजूने केल्याचा आरोप केला होता. इतकंच काय आयपीएल 2025 स्पर्धा फिक्स असल्याचा आरोप केला होता.